Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघातील वातावरण चांगलेच राजकीय झालेले पाहायला मिळाले. सर्वच उमेदवार मैदानात उतरले व कार्यकर्त्यांचेही जथ्थे बाहेर पडू लागले.
दरम्यान या निवडणुकांत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते. याबाबत अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची द्वितीय खर्च तपासणी मंगळवारी पार पडली.
खर्च करण्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. डॉ. सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांनी प्रत्येकी २३ लाख रुपये खर्च केला आहे. तसेच खर्चामध्ये आलेली तफावतही मान्य केली आहे.
नगर, शिर्डी मतदारसंघासाठी १३ में रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. खर्च तपासणीचा पहिला टप्पा ३ मे रोजी पार पडला होता.
त्यावेळी नगर लोकसभा मतदारसंघातील ४ उमेदवार दांडी मारली होती. त्यानंतर त्यांना खुलासा सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती . दुसरा टप्पा मंगळवारी ७ मे रोजी संपन्न झाला.
यावेळी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी ६ मेपर्यंतचा खर्च सादर केला आहे. निवडणूक आयोग व उमेदवार यांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली होती. ही तफावत उमेदवारांनी मान्य केली आहे. शेवटची खर्च तपासणी ११ मे रोजी पार पडणार आहे.
खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांनी नगर लोकसभा मतदारसंघ तर निरीक्षक ममता सिंग यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची तपासणी केली. पुढील तपासणीसाठी सर्व उमेदवारांनी खर्च नोंदवही व इतर कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन खर्च निरीक्षकांनी केले आहे.
अहमदनगर
उमेदवार केलेला खर्च तफावत
सुजय विखे पाटील (भाजप) २३,०८,८९३ २,०३,६८१
नीलेश लंके (राष्ट्रवादी-श.प.) १८,१०,३९३ २७,१६५
दिलीप खेडकर (वंचित) ३,२९,५६५ नाही
उमाशंकर यादव (बसप) २८,७९० नाही
शिर्डी
उमेदवार केलेला खर्च तफावत
भाऊसाहेब वाकचौरे (उद्धवसेना) १८,३४,५१२ ५,६१,१८३
सदाशिव लोखंडे (शिंदेसेना) २३,८६,३२५ १४,९०,७३०
उत्कर्षा रुपवते (वंचित) १५,५८,६०६ ३,०८,१५१