Ahmednagar Politics : विखे-मुरकुटे वाद पेटला ! एकमेकांबाबत गौप्यस्फोट करत सगळंच काढलं, तिकडे खा.लोखंडेंचं टेन्शन वाढलं

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सेना विरोध सेने अशी लढत होणार आहे. खा. लोखंडे विरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत आहे. पण आता या ऐन प्रचाराच्या काळात विखे-मुरकुटे वाद उफाळून आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एकमेकांवर आरोप करत एकमेकांचा समाचार घ्यायला सुरवात केली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारार्थ श्रीरामपुरात शनिवारी सभा पार पडली. यावेळी मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. सभेत विखे पाटील यांनी नाव न घेता मुरकुटे यांच्यावर टीका केली. रविवारी मुरकुटे यांनीही विखेंविरु‌द्ध पत्रक काढत त्यांचा समाचार घेतला आहे. उमेदवार सदाशिव लोखंडे यांची मात्र विखे – मुरकुटे वादामुळे अडचण झाली आहे.

विखे पाटील काय म्हणाले?
श्रीरामपूर एमआयडीसीमधील उद्योग कोणी पळून लावले? हे श्रीरामपूर तालुक्याला माहीत आहे. मात्र, आता जनतेला हे सर्व समजले आहे. त्यामुळे जनतेने त्यांना राजकारणातून बाजूला केले आहे.

श्रीरामपूरच्या कारखान्याला कोणतेही भविष्य राहिलेले नाही. या नेत्याने तालुक्याला शिवराळ भाषेशिवाय विधायक असे काहीही दिलेले नाही. जे पेरले तेच आता यापुढे उगवणार आहे. आपले कर्म येथेच फेडावे लागणार आहे अशी टीका त्यांनी केली होती.

भानुदास मुरकुटे यांचा पलटवार
एमआयडीसीतील उद्योग पळवून लावल्याचा आरोप निराधार आहे. १९८३ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसीच्या उद्घाटनाला तत्कालीन आद्योगमंत्री रामराव आदिक आले होते. त्यावेळी आपण काँग्रेसचे आमदार होतो. मात्र तरीही कार्यक्रम पत्रिकेत आपल्याऐवजी त्यावेळचे वैजापूरचे आमदार गोविंदराव आदिक यांचे नाव घेतले गेले.

त्या प्रकाराला विरोध नोंदविला होता, एमआयडीसीला नाही. माझ्यावर आरोप करणारे विखे पाटील १९९६ पासून आजवर राज्यात मंत्री, पालकमंत्री राहिले आहेत. त्यांचे वडील हे मतदारसंघाचे ४० वर्षे खासदार होते. श्रीरामपूरच्या जनतेने दोघांनाही मते दिली. मात्र त्यांनी येथे उद्योग का आणले नाहीत? असा खडा सवाल त्यांनी केला आहे.

 खा. लोखंडे यांची मोठी अडचण
उमेदवार सदाशिव लोखंडे यांची मात्र विखे – मुरकुटे वादामुळे अडचण झाली आहे. लोखंडे व मुरकुटे यांचे राजकीय संबंध चांगले होते.

२०१४ च्या निवडणुकीत लोखंडे यांनी शिर्डीतून उमेदवारी करण्यासाठी मुरकुटे यांनी पुढाकार घेतला होता. मुरकुटे व विखे पाटलांच्या राजकीय संघर्षामुळे मुरकुटे हे काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe