Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे एक वेगळ्याच धर्तीचं. मग यात सगेसोयरे पॅटर्नही तितकाच महत्वाचा. या राजकारणात वरिष्ठांनी देखील नेहमी लक्ष घातले.
येथील राजकारणावर सहकार, शैक्षणिक संस्था, कारखानदारी यांचे देखील पगडा पाहायला मिळाला. पण या सर्व गोष्टीत एक महत्वपूर्ण गोष्ट देखील आहे जी आपण काळजीपूर्वक पाहिली पाहिजे ती म्हणजे विखे पॅटर्न !
विखे पाटील घराण्याची राजकीय ताकद हे भलेभले देखील मान्य करतात. अगदी आमदारकी असो की थेट जिल्हा परिषद यात शक्यतो विखे घराण्याचे वर्चस्व पाहायला मिळत असते. दरम्यान आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये देखील त्यांचेच वर्चस्व वाढत आहे का असे चित्र दिसते. विखे पाटील हेच अहमदनगरच्या राजकारणातील हुकमी एक्का होतायेत का अशीही चर्चा लोकांत असते.
भाजपची ताकद वाढली
तस पाहिले तर भाजप हा आता शक्तिशाली पक्ष बनत चाललेला आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपत आल्यानंतर भाजपची पाळेमुळे आणखी जास्तच रोवली गेली असे म्हटले जाते. भाजपची राजकीय भिस्त अहमदनगरमधील ही विखे यांच्यावरच जास्त असल्याची दिसते.
शिवसेना, राष्ट्रवादीलाही विखे यांचाच आधार ?
महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी यांना देखील अहमदनगरमध्ये विखे पाटील यांचाच आधार वाटत असल्याचे दिसते. कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात खा.लोखंडे बोलून गेले की ,
मुख्यमंत्री शिंदेंनी मला सांगितल आहे की, पुढील काळात तुमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत.
तसेच आम्हीही इथून मागे ज्या चुका झाल्या असतील त्या सोडून यापुढील काळात विखेंच्या नेतृत्वाखाली काम करू असे ते म्हणाले. तसेच महायुतीमधील राष्ट्रवादीचे आमदार आ. काळे हे विखे यांच्या अगदीच जवळ गेल्याचे दिसते. आगामी आमदारकीला त्यांना विखे यांचाच आधार असेल असेही काही जाणकार म्हणतात. म्हणजेच अहमदनगरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीलाही विखे यांचाच आधार घ्यावा लागत आहे का ? असेच चित्र सध्या दिसत आहे.
आमदारकी निवडणुकांतही निर्णायक भूमिका
अहमदनगर जिल्ह्यातील आमदारकी अर्थात विधानसभेला विखे पाटील यांच्या भूमिकेची नेहमीच चर्चा असते. या निवडणुकांत विखे पॅटर्न ची चर्चा खूपच रंगत असते. आमदारकी निवडणुकांतही निर्णायक भूमिका विखे पाटीलच बजावतात अशीही चर्चा लोक करत असतात.