Ahmednagar Politics : महाराष्ट्राचे राजकारण सध्या महायुती व महाविकास आघाडी यातील विविध पक्षांच्या एकत्रीकरणामुळे पूर्ण बदलेले आहे. एकमेकांच्या विरोधात बसणारे आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. अहमदनगर लोकसभेत विखे-लंके सामना चांगला रंगात आलेला असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मोठे राजकीय सूतोवाच केले आहे. राज्यातच नव्हे, तर देशातील राजकारण बदलले आहे.
महाविकास आघाडी राज्यात चमत्कार घडवेल. जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने जिंकेल. नक्कीच चमत्कार घडेल असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी विधानसभेला श्रीगोंद्याची जागा आपल्याकडे घेऊ याबाबतही सूतोवाच केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले आ. थोरात
आ. थोरात म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. विकासाच्या नावाने बोंबाबोंब असताना निव्वळ धर्माच्या नावाखाली भावनिक राजकारण करून सत्ता मिळविण्याचे काम भाजपने केले आहे.
भाजपच्या भावनिक राजकारणाला जनता तिसऱ्यांदा फसणार नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. अहमदनगर जिल्ह्यातील निवडणूक, तर लोकांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे ही लाट भाजपला थोपविता येणार नाही.
श्रीगोंदेची जागा नेमकी कुणाकडे?
महाविकास आघाडीत श्रीगोंदेची जागा कोणाकडे असणार याबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर घडविण्यासाठी राज्यातील जनता आणि महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पुढचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल.
विधानसभेच्या जागावाटपात श्रीगोंदेची जागा काँग्रेस मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात श्रीगोंद्याच्या जागेसाठी रस्सीखेच महाविकास आघाडीत दिसेल असे चित्र सध्या आहे.