अहमदनगरचे तिसरे खासदार कोण होते ? कोणी उभारले होते महाराष्ट्रातील पहिले वृद्धाश्रम ? वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली जात आहे. यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. महाविकास आघाडीने या जागेवर पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना संधी दिलेली आहे.

या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत मात्र 18 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे. शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज स्वीकाण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान आज आपण 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत नगरचे खासदार कोण होते ? यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

अहमदनगरचे तिसरे खासदार कोण होते ?

अहमदनगरने सहकार क्षेत्रात मोठी नेत्र दीपक कामगिरी केलेली आहे. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. दरम्यान या नगरच्या शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, क्रीडा आणि सहकार क्षेत्रात अनेक घराण्यांनी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. पण यात सर्वात जास्त योगदान फिरोदिया घराण्याचे आहे. याच फिरोदिया घराण्यातील मोतीलाल फिरोदिया हे नगरचे तिसरे खासदार होते.

मुंबई प्रांताचे विधिमंडळाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब फिरोदिया यांचे पुत्र मोतीलाल फिरोदिया हे अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे तिसरे खासदार राहिले होते. खरे तर 1962 मध्ये तिसऱ्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. त्यावेळी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेचे पहिले खासदार उत्तमचंद रामचंद भागवत यांना उमेदवारी जाहीर केली.

मात्र उत्तमचंद रामचंद भागवत यांनी फिरोदिया कुटुंबाच्या उपकाराची जाण ठेवून ही जागा मोतीलाल फिरोदिया यांच्यासाठी सोडली. विशेष म्हणजे मोतीलाल फिरोदिया यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न देखील केलेत. 1962 च्या निवडणुकीत मोतीलाल फिरोदिया आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर कोंडाजी भापकर यांच्यात काटेदार लढाई झाली.

दोघेही उमेदवार तुल्यबळ होते. या निवडणुकीत फिरोदिया यांना एक लाख 13 हजार 159 मते मिळालेत आणि भापकर यांना 99,121 मते मिळालीत. ही निवडणूक फिरोदिया यांनी 14000 मतांनी जिंकली. ते अहमदनगर जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष बनलेत. त्यांच्याच काळात जिल्हा बँकेच्या भव्य इमारतीची उभारणी पूर्ण झाली.

त्यांनी अनेक कौदूकास्पद कामे केलीत. त्यांनी महाराष्ट्रातील पहिले वृद्धाश्रम देखील बांधले. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी हे तिन्ही पंतप्रधान त्यांच्या कामाचा आदर बाळगत होते. मात्र 1967 मध्ये त्यांना उमेदवारी दिली जात असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला.

इतरांना संधी मिळावी ही त्यांची धारणा होती. सध्या फिरोदिया परिवार हा राजकारणापासून दूर आहे. पण, मोतीलाल फिरोदिया यांचे नातू सध्या समाजकार्यात सक्रिय आहेत. आय लव नगर ब्रँडमेकर नरेंद्र फिरोदिया हे मोतीलाल फिरोदिया यांचे नातू आहेत. त्यांनी राजकारणात आले पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे. यामुळे जेव्हाही लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका येतात तेव्हा फिरोदिया कुटुंबाची चर्चा रंगते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe