Ahmednagar Politics : निवडणुकांचा ‘ज्वर’ आता शिगेला पोहोचला आहे. काही ठिकाणी येत्या दोन दिवसात सात तारखेला तर काही ठिकाणी १३ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता हातात थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने आता महत्वपूर्ण नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. परंतु आता या सभांना गर्दी जमविण्यासाठी लोकांना पॅकेज दिले जात असल्याची चर्चा आहे.
नगर शहरातील मजूर अड्ड्यावर एक एजंट आला. त्याने मजुरांना सभेसाठी येण्याची ऑफर दिली. सभेसाठी आलात तर तीनशे रुपये मिळतील, असे या एजंटने सांगितले. मात्र, उपस्थित मजूर म्हणाले, ‘पाचशे रुपये देत असाल तर येऊ. कारण तेथे चार तास बसावे लागते.’ विशेष म्हणजे हा संवाद मीडियातील एका प्रतिनिधींसमोर सुरु होता.
पैसे देऊन आम्हाला सभेला बोलविले गेले. मात्र, ठरलेले पैसे दिले नाहीत, असे अनेक व्हिडीओ अहमदनगरसह इतर मतदारसंघातही व्हायरल झाले आहेत. सभांना पैसे देऊन गर्दी जमवली जाते हे वास्तव असून, या बाबीस अनेकांनी दुजोरा दिला आहे.
काही एजंट यासाठी नियुक्त केले जातात. त्यांना कंत्राटच ठरवून दिले जाते अशी चर्चा आहे. दिवसभर काम केले तर तीनशे, पाचशे रुपये मजुरी मिळते.
त्यामुळे अनेक लोक कामाला जाण्याऐवजी प्रचारात सभांमध्ये सहभाग घेऊन पैसे मिळवितात. त्यामुळे कामाला जाण्यापेक्षा सभा परवडली असेही हे लोक सांगतात.
विद्यार्थ्यांनाही ओढले जाते जाळ्यात
अहमदनगर शहरात अनेक विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना पैसे देऊन सभांना उपस्थित राहण्याची ऑफर दिली जाते, असे देखील चर्चा सुरु आहेत. यातील एका विद्यार्थ्याने तर असे सांगितलं की, “अगोदर आम्हाला एकत्र जमा केले जाते.
तेथे घोषणा काय द्यायच्या हे प्रशिक्षण दिले जाते. नंतर टोप्या, पंचे दिले जातात. त्यानंतर रॅलीने सभेसाठी नेले जाते. सभा संपल्यानंतर पैसे दिले जातात.
काही लोकांना पैसे न देता फसविलेही जाते. ज्या सभांचे पैसे मिळतील त्या सभेला गरजू लोक जातात. हे लोक मतदान त्या पक्षालाच करतील याचा मात्र भरवसा नाही,” असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे असे एका मीडियाने छापले आहे.