Ahmednagar Politics : अहमदनगर मतदारसंघातील राजकारण विखे-लंके यांच्या टाईट फाईट मुळे चांगलेच रंगले आहे. डाव प्रतिडाव, राजकीय खेळी आदींमुळे मतदारांनाही चर्चेसाठी खुराक मिळत आहे.
एकीकडे महाविकास आघाडीने आपले उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी दिग्गज नेते कामाला लावत फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे विखे यांनी आपली यंत्रणा वापरत प्रचारसभेचा तडाखा लावला आहे.
थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. दरम्यान आता हे वातावरण एकीकडे रंगत असताना निलेश लंके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लंके यांनी पोलिसांना उद्देशून एक विधान केले होते व या ‘बाप’ प्रकरणाची चर्चा सर्वत्र झाली होती
व आता हेच वक्तव्य त्यांच्या अडचणीत वाढ करण्याची शक्यता निर्माण झालीये. याचे कारण असे की, त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
या संघटनेने निवडणूक आयोग आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहीत कारवाई करा असे म्हटले आहे. पोलिसांचा बाप काढणाऱ्या निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्यांच्या वक्तव्याचा पोलीस बॉईज संघटनेने निषेध केलाय.
काय म्हणाले होते निलेश लंके
एका प्रकरणात निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी एका भाषणात बोलताना पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. कारवाई झाल्यनंतर लंके यांनी भाषणादरम्यान “इथे पोलीस विभागातील कोणी असेल तर संबंधित पीआयला सांगा तुमचा बाप दहा मिनिटात तिथे येतोय” असे वक्तव्य केले होते.
खा. सुजय विखे म्हणतात..
निलेश लंके यांच्या या वक्तव्यानंतर मात्र भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले होते की, मी पांडुरंगाचे आभार मानतोय की, यामुळे समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा जनतेच्या समोर आलाय.
अशा प्रकारची घटना याआधीही घडली आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती अहिल्यानगरची जनता कदापिही स्विकारणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.