Ahmednagar Politics : लंकेंच्या विजयाने अहमदनगरमध्ये आता रोहितच ‘दादा’, जगतापांसह अनेकांची राजकीय गणितेही ‘अशी’ फिरणार

Pragati
Published:
lanke

Ahmednagar Politics : महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्या विजयाने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय गणिते चांगलीच बदलतील. या विजयाने आता राजकीय संघर्षात असणाऱ्या आमदार रोहित पवारांना बळ मिळाले आहे. या निवडणुकीत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची जबाबदारी चोख बजावली.

खासदार निलेश लंकेंच्या विजयानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांचा प्रभाव वाढणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार जनतेतत उतरुन काम करणारे आमदार आहेत. या निकालामुळे पक्षांतर्गत निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रथमपासून महायुतीचे सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात जामखेड तालुक्यात चुरस पहायला मिळाली. हीच चुरस आज मतमोजणीच्या दिवशी दिवसभर दिसून आली. सकाळी मतमोजणी फेरीत आघाडीवर असलेले विखे दुपारनंतर पिछाडीवर गेले, तर लंके यांनी आघाडी मिळवली.

लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना आमदार रोहित पवारांची मोठी साथ मिळाली. पवार यांनी सुरुवातीला तालुक्यात नीलेश लंके यांच्या समवेत प्रचारसभा घेतल्यानंतर, त्यांनी बारामती मतदारसंघातही प्रचारासाठी वेळ दिला होता. त्यानंतर पुन्हा जामखेड तालुक्यात प्रचारसभा घेत जनतेशी संवाद साधला. या निवडणुकीत आ. पवार यांच्या कार्यकर्त्यांचा संच आयताच लंके यांना उपयोगी आला.

यामुळे जामखेड तालुक्यात लंके यांना विनासायास निवडणुकीला सामोरे जाता आले. लंके यांच्या अनुपस्थितीत जामखेडला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची झालेली प्रचार सभा आणि या सभेला जमलेली अभूतपूर्व गदीं बरेच काही सांगून जाते. आ. पवार यांचा सक्रिय कार्यकर्ता या निवडणुकीत अत्यंत जोमाने काम करताना दिसला.

लोकसभा निवडणूक असूनही ग्रामपंचायत निवडणुकीसारखा प्रचार झालेला यावेळी पहायला मिळाला. एकंदरीतच आता जिल्ह्यातील विविध गणिते पाहता व शरद पवार गटास असणारी लोकप्रियता पाहता रोहित पवार यांच्या शब्दाला धार येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील त्यांची पॉवर देखील वाढणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तसेच आगामी विधानसभेला लंके यांच्या लोकप्रियतेचाही फायदा आ. रोहित पवार यांना होईल असे दिसते.

जगतापांसह अनेकांची राजकीय गणितेही फिरतील
जगतापांसह अनेकांची राजकीय गणितेही फिरतील अशी चर्चा आहे. कारण जे अजित पवार गटात आहेत त्यांची टक्कर आता शरद पवार गटाशी होईल असे चित्र आहे. एकंदरीतच महाराष्ट्रातील लोकसभेचे चित्र पाहता अजित पवार गटास विधानसभेला किती यश मिळू शकेल याचा अंदाज सध्या बांधता येत नाहीये.

त्यामुळे लंके यांच्या विजयाने शरद पवार गटाची ताकद वाढली असल्याने अजित पवार गटात असणाऱ्या राजकीय नेत्यांची राजकीय गणिते फिरतील अशी चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe