उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अचानक गायब होणे या गोष्टींची महाराष्ट्रात चांगलीच दखल घेतली जाते. कारण त्यांच्या गायब होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात. तसेच अनेक राजकीय समीकरनेही बदललेली दिसतात. मागील काही दिवसांपासून ते लोकसभेच्या प्रचारातील त्यांच्या भाषणांमुळे चांगेलच चर्चेत होते.
आता मात्र अचानक ते गायब झाले आहेत. ते कुठेच सध्या दिसत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मागील दोन दिवसांपासून ते निवडणूक प्रचारातही सहभागी झालेले दिसेनात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील महायुतीच्या सभेला देखील ते नसल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज सादर केला. त्यावेळी देखील अजित पवार यांच्याऐवजी तेथे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तेथे गेलेले दिसले.
त्यामुळे आता अजित दादा नेमके कुठे गेलेत अशा चर्चा सुरु झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांची तब्बेत बरी नसल्यानं गैरहजर आहेत असे सांगण्यात आले आहे. पण अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा आता हळूहळू रंगू लागलीये.
अजित दादा जेव्हा जेव्हा गायब झाले तेव्हा तेव्हा राज्यात अनेक राजकीय उलथापालथ घडवून आणतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत अजित पवार दिसले नाहीत आणि वेगळ्याच चर्चा तेथे सुरु झाल्या. तब्बेत बरी नसल्याने अजितदादा आराम करत असल्याने ते सभेला आले नाहीत अशी माहिती समजत आहे.
शरद पवार म्हणतात…
शरद पवारांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अजित पवारांची तब्ब्येत खरंच बरी नाही असे सांगतिले. बारामती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलेली सर्वश्रुत असल्याने सध्या अजित दादांच्या गायब होण्यामागे हे देखील एक कारण सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी मात्र अजित पवार गायब असण्याबाबत काही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.