महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या पक्षांतर्गत बंडाळीचे परिणाम आताच्या लोकसभा निवडणुकांत दिसत आहेत. अनेक राजकीय गणिते या महायुती व महाविकास आघाडीमुळे बदलताना दिसली.
आता याचा परिणाम अहमदनगरच्या राजकारणावरही होताना दिसत आहे. अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.९) कर्जतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे.
कालपर्यंतच्या सोबती लंकेंविरोधात व आजवरच्या राजकीय वैरी विखेंच्या विजयासाठी अजित पवारांची सभा असल्याने अहमदनगर जिल्ह्यात सर्वानाच या सभेची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे त्यानंतर नीलेश लंके यांच्यासाठीही आमदार रोहित पवार आणि शरद पवार यांची सभा निश्चित झाल्याचे समजते.
त्यामुळे प्रचारानिमित्त बारामतीच्या काका-पुतण्याची राजकीय लढाई प्रचाराच्या मैदानात प्रत्यक्षात पहावयास मिळणार आहे. या काका पुतण्याच्या लढाईत अहमदनगरची राजकीय गणिते कशी बदलतील याबाबतही चर्चा लोक करू लागले आहेत.
महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील, तर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांची यंत्रणा आणि स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचा प्रत्येक भाग आणि बूथ पिंजून काढला आहे. विखे यांच्यासाठी महायुतीकडून गुरुवारी (दि.९) कर्जत-जामखेड मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादी पक्ष विभाजनानंतर अजित पवार प्रथमच कर्जतला येत आहेत. त्यात बारामती लोकसभेच्या पवार कुटुंबीयांच्या आरोप प्रत्यारोपाची झलक विखे यांच्या प्रचारानिमित्त कर्जतला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार या सभेत काका शरद पवार, पुतणे आमदार रोहित पवार यांसह जुने त्यांचे सहकारी नीलेश लंके यांच्याबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
चोंडीच्या काका-पुतण्याची दिलजमाई महत्वपूर्ण
चोंडीचे काका-पुतणे राम शिंदे आणि अक्षय शिंदे हे एकमेकांना टोकाचा राजकीय विरोध करत होते. आता अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांची साथ सोडत अजित पवार गटास नुकतीच साथ दिली. महायुतीचा घटक म्हणून शिंदे काका-पुतणे टोकाची टीका विसरत आगामी काळात एकमेकांचे गोडवे गाताना पुन्हा राजकीय व्यासपीठावर दिसतील.
काका-पुतण्याची लढाई
पवार काका पुतण्याची लढाई बारामतीत सर्व महाराष्ट्राने पाहिली. पण आता तीच लढाई अहमदनगरमध्येही आता पाहायला मिळणार का? या दोघांची राजकीय खेळी नेमकी कुणासाठी जादू ठरणार? याबाबत खुमासदार चर्चा ऐकायला मिळत आहेत.