विधानसभा निवडणूक

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर,

निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार सचिन औटी, पुनम दंडिले, महसुल नायब तहसिलदार तसेच निवडणूक शाखेचे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख व राहुरीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे, राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह निवडणूक शाखेचे अनिल टेमक,

प्रमोद वाघमारे, सनी लोखंडे आदी यात जातीने लक्ष देऊन आहेत. निवडणूक लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व या काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांमध्ये विविध प्रकारची १६ पथके तैनात करण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मतदारांना पैशाचे आमिष, अवैधरित्या रोख रक्कम व अवैध साहित्याची वाहतूक व अन्य बेकायदेशीर बाबींना आळा घालण्यासाठी विशेष पथकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्हिडिओग्राफर असे हे पथक संपूर्ण मतदारसंघातील २८ सेक्टरमध्ये फिरती राहणार आहेत. याशिवाय वांबोरी, मुळा डॅम फाटा आणि मिरी (ता. पाथर्डी) येथे तपासणी नाका राहणार आहे.

स्टॅटिक सर्विलन्स टीमची ६ पथके, फ्लाईंग स्क्वॉड टीमची ६ पथके, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीमची ३ तर व्ही. व्ही.टी.चे तीन आणि अकाउंटिंगचे एक पथक या संपूर्ण निवडणूक काळात २४ तास कार्यरत राहणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक चार चाकी वाहनातील मोठ्या रकमा याच भरारी पथकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अनेकांना पुरावे सादर करायला नाकी नऊ आले होते.

एकंदरीतच १८ एप्रिलपासून अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राहुरी मतदार संघातील राहुरी (१७८ मतदान केंद्र), नगर (७० मतदान केंद्र), पाथर्डी (५९ मतदान केंद्र) तालुक्यात या भरारी पथकांची नजर मात्र ३०७ मतदार केंद्रांभोवती आतापासूनच असणार आहे.

Ahmednagarlive24 Office