लोकसभा निवडणुकीचा निकाल काल ४ जूनला लागला. त्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. यामध्ये भाजपला अत्यंत मोठा पराभव स्वीकारावा लागला. भाजपसह महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ १८ जागा जिंकता आल्या. यामध्ये ४५ प्लस असा नारा भाजपने दिला होता तो फोल ठरल्याचे दिसते.
दरम्यान या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आता महाराष्ट्राच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडणार आहे.
नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. परंतु मी हरणाऱ्यातला नसून ताकदीने मैदानात उतरेल असा माणूस आहे. परंतु सध्या पक्ष नेतृत्वाला माझी विनंती आहे की मला उप मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
शिंदे सरकार धोक्यात आलंय? भाजप शिंदे व पवार गटापासून दूर जाण्याची ‘खेळी’ खेळतंय?
फडणवीस यांनी जर राजीनामा दिला तर त्यांचे मंत्री देखील राजीनामा देऊ शकतील. तसे झाले तर शिंदे सरकार अल्पमतात येईल व हे सरकार धोक्यात येईल अशी चर्चा आहे. तसेच शिंदे व पवार गटापासून दूर जाण्यासाठी व पक्ष फोडाफोडीबाबत जी नाराजगी आहे ती दूर करण्यासाठी भाजप ही ‘खेळी’ खेळतंय का अशीही चर्चा आहे.
सांगितली पराभवाची कारणे
निकाल आल्यानंतर झालेल्या पराभवांबाबत विचारमंथन करण्यासाठी भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी वरील विधान केले. तसेच पराभवाची कारणे देखील सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव, संविधान बदलणार असल्याचा विरोधकांनी केलेला प्रचार आदींचा फटका भाजपला बसला असल्याचे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात अत्यंत महत्वपूर्ण ठरलेला असून आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला होता. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार झाला तो खोडून काढण्यात आम्हाला अपयश आल्याचे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा कांद्याच्या भावाचा मुद्दा देखील आमच्या पराभवाला कारणीभूत ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाल्यावर आम्ही मदत दिली होती परंतु
आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करू शकलो नसल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे आता नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. परंतु मी हरणाऱ्यातला नसून ताकदीने मैदानात उतरेल असा माणूस आहे. परंतु सध्या पक्ष नेतृत्वाला माझी विनंती आहे की मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे मोठे विधान त्यांनी केले आहे.