लोकसभेसाठी महाराष्ट्रातील ज्या चुरशीच्या जागा आहेत त्या जागांपैकी एक म्हणजे बारामती. येथे सुप्रिया सुळे निवडून येणार की सुनेत्रा पवार याकडे देशाचे लक्ष असणार आहे. दरम्यान या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले होते.
मतदान झाल्यानंतर मतदारसंघात ईव्हीएम मशिन तेथील गोदामात ठेवले होते. हे ईव्हीएम मशिन ज्या गोदामात ठेवले होते त्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळपासून बंद आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलाय. याबाबतची तक्रारही त्यांनी दिली आहे.
लक्ष्मीकांत खाबिया हे सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी असून त्यांनीच याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. ही तक्रार दिल्यानंतर 45 मिनिटे बंद झालेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
बारामती मध्ये 7 मे रोजी मतदान झाले तर याची मतमोजणी 4 जूनला होणार असून निकाल लागणार आहे. मतमोजणीपर्यंत ईव्हीएम मशिन्स बारामतीतील विधानसभा मतदारसंघ गोदामात ठेवले गेले आहेत.
सकाळी लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे कळल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली. यात काही काळेबेरे होऊ शकते असा अंदाज वर्तवला. त्यांच्या तक्रारीची दखल आयोगाने घेतली व हे कॅमेरे सुरू करण्यात आले.
लक्ष्मीकांत खाबिया एका मीडियाशी बोलताना म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे त्या गोदामाचे CCTV सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद असल्याने काही काळं बेरं तर नाही ना? अशी शंका येतेय.
याबाबत आम्ही आधिकाऱ्यांशी संपर्क साधत असून बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी टेक्निशियन्स उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले होते. तसेच आमच्या कार्यकर्त्यांना गोदामात काय चाललेय हे पाहू दिले जात नसून तेथे काय चाललेय ते कळत नसल्याचेही ते म्हणाले होते.