विधानसभा निवडणूक

Ahmednagar Loksabha : आ. निलेश लंके की, राणीताई कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

Published by
Sonali Shelar

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीचा बिगुल एकदाचा वाजला असून, भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या यादीत नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्याने खा. विखे कामाला लागले आहेत. 

दुसरीकडे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला? याची गेल्या कित्येक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे स्वतः निवडणूक लढविणार कि त्यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके निवडणूक लढविणार, याबाबत संभ्रमावस्था आहे.

आ. लंके हे तसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा गटात सध्या सक्रिय आहेत. मात्र, अलिकडील राजकिय घडामोडीनंतर आ. लंके यांची राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या तुतारीकडे जवळिकता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांची भूमिका मात्र आ. लंके यांनीच निवडणूक लढवावी, अशी आहे. म्हणूनच तर नगर दक्षिणेतून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

जिल्ह्याच्या राजकिय पटलावर मात्र विखे विरुद्ध लंके असाच सामना होणार असल्याचे ठामपणे बोलले जाते. मात्र, आ. लंके कि राणीताई निवडणूक लढविणार, हाच प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. उमेदवारीचा हा गोंधळ केव्हा दूर होणार, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Sonali Shelar