विधानसभा निवडणूक

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात घोळ समोर ! अहमदनगरमध्ये हजारो मतदारांना मतदानच करता येणार नाही?

Published by
Ahmednagarlive24 Office

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र एकिकडे उभे केले जात असले तरी त्याचवेळी मतदार याद्यांमधील सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांना यावेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.

ज्या नवमतदारांनी नावनोंदणी केली, अशा अनेक मतदारांची नावे यादीत आलेली नाहीत, तर काही सुदृढ मतदारांचा उल्लेख अंध, अपंग करण्यात आला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हजारो मतदारांना यावेळी त्यांच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार असल्याचे दिसते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, दुबार नावे वगळणे,

मयताची नावे रद्द करणे यासाठी वर्षभरात अनेक विशेष मोहिमा राबविल्या जातात. मात्र या मोहिमांमध्ये मतदारांनी केलेली नोंदणी, सुचविलेले बदल आणि त्यासाठी भरून दिलेले विविध फॉर्म व्यवस्थितरित्या हाताळले जात नसल्याने मतदारयाद्यांमध्ये सावळा गोंधळ निर्माण होतो. यावेळीही असाच प्रकार अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून समोर आला आहे.

१८ वर्षावरील अनेक तरुण-तरुणींनी मतदानासाठी यावेळी नावनोंदणी केली होती. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते महापालिकेने नेमलेल्या बीएलओमार्फत जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या नवमतदारांना मतदानाचा हक्क मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र अशी नावनोंदणी करणाऱ्या अनेक नवमतदारांची नावे यादीत आलेलीच नाहीत. मतदान अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना हा प्रकार उजेडात आला आहे. ज्यांची नावे नोंदणी करूनही यादीत आलेली नाहीत त्यांना यावेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार हे आता निश्चित आहे.

अशा नवमतदारांची शहरातील संख्या हजारोंच्या संख्येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार याद्यांमधील अनेक घोळ समोर येत आहेत. मयत मतदारांच्या वारसांनी मृत्यूचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही मयताचे नाव यादीतून कमी करण्यात न आल्याचे प्रकारही समोर येत आहेत.

त्याचबरोबर जे मतदार सुदृढ आहेत त्यांचा अंध, अपंग असा उल्लेख यादीत आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत मतदारांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकास्तरावर निवडणुकीचे काम पाहणारे

अधिकारी-कर्मचारी यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले तरी जिल्हा निवडणूक शाखा आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हेकेखोर कारभारामुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Ahmednagarlive24 Office