विधानसभा निवडणूक

Maharashtra Politics : पक्षफुटीमुळे दोस्त दोस्त न राहा.. ! आधी केला ज्यांचा विरोध, ज्यांनी हरवले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ, पहा ‘गमती’पूर्वक लढती

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील तीन वर्षात राजकारणात असे काही बदल झाले आहेत की जे शत्रू होते, ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांनी हरवले किंवा ज्यांना हरवले अशा नेत्यांच्या विजयासाठी दिग्गजांना एकत्र यावे लागले आहे.

पूर्वी ज्यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यांनाच हरवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागत आहेत. अशा अनेक प्रतिष्ठेच्या लढाई पाहायला मिळणार आहेत. उदाहरण म्हणून पाहायचे झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी हरवले होते आता तेच बारणे हे महायुतीचे उमेदवार असल्याने अजित पवार यांना त्यांच्या विजयासाठी पळावे लागत होते.

तेव्हा अजितदादा हे पार्थसाठी झटत होते व बारणे यांना पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. हीच स्थिती रायगडमध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागीलवेळी सुनील तटकरेंवर हल्लाबोल करत होते. आता ते त्यांचा प्रचार करताना दिसणार आहेत.

* ज्यांना हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी जीवाचे रान केले आज उलट स्थिती …
– मागीलवेळी बुलडाण्यात प्रतापराव जाधय शिवसेनेचे उमेदवार असल्याने त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नेते यांनी सभा घेत जीवाचे रान केले. आता तेच जाधव शिदेसेनेत असून त्यांना हरविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या.

– २०१९ मध्ये सातारामध्ये उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने शरद पवारांनी आपले सगळे कसब पणाला लावत त्यांना जिंकून आणलं. आता तेच उदयनराजे भाजपकडून उभे असल्याने पवार आता त्यांच्या विरोधात सभा घेत त्यांना हरवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.

– अमरावतीमधेही तीच स्थिती असून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते त्यांच्या प्रचारात उतरले होते पण आज तेच नेते त्यांच्या विरोधात प्रचार करत आहेत.

– नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाडले. आज त्याच चिखलीकरांच्या (भाजप) प्रचाराची कमान चव्हाण यांच्यावर आहे.

– शिरूरमध्ये २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते जीवाचे रान करत होते. शिवाजीराव अढळराव पाटील यांचा त्यावेळी पराभव केला. परंतु आता तेच शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या विजयासाठी अजित पवार गटाचे नेते प्रयत्न करत आहेत.

– बीडमध्ये पंकजा मुंडे यांना हरवण्यासाठी ज्या धनंजय मुंडे यांनी जीवाचे रान केले त्यांच्या विजयासाठी आता ते प्रयत्न करणार आहेत.

Ahmednagarlive24 Office