विधानसभा निवडणूक

मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र नसेल तरी ‘नो टेन्शन’ ! हेल्थ इन्शुरन्स कार्ड, जॉबकार्डसह ‘हे’ १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाला जाताना निवडणूक ओळख पत्र न्यावे लागते. विविध गैरप्रकार टाळण्यासाठी ही ओळखपत्रे उपयोगी ठरतात. परंतु अनेकदा सर्वांकडे हे निवडणूक ओळख पत्र असतेच असे नाही.

त्यामुळे काहीजण मतदान करण्याचे देखील यामुळे टाळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की निवडणूक आयोगाने निवडणूक ओळख पत्राशिवाय 12 प्रकारांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे.

मतदारांचे मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, पॅनकार्ड आदीसह बारा प्रकारच्या कागदपत्रांना ग्राह्य धरले जाणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय पासपोर्ट, वाहनचालक परवाना , केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड,

मनरेगांतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मतदानाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने विविध गोष्टी सुकर केल्या आहेत. मतदान करणाऱ्यांची संख्या जास्तीतजास्त वाढवण्यासाठी सवर्तोपरी प्रयत्न अयोग्य करत आहे. विविध प्रकारच्या सोयीसुविधा, वृद्ध व दिव्यांगांना घरबसल्या मतदान, मतदानाच्या ठिकाणी पाळणाघरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.

Ahmednagarlive24 Office