विधानसभा निवडणूक

मोनिका राजळेंनी यंदा हॅट्ट्रीक केली, तर त्यांना मंत्रीपद फिक्स ! पण आहे ही अडचण…

Published by
Tejas B Shelar

शेवगाव-पाथर्डीच्या विद्यमान आ. मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महायुतीकडून, तर प्रताप ढाकणे यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी केलीय. या तिघांशिवाय जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनाही यावेळी लढायचंय. शिवाय भाजपमध्ये राजळेंना विरोध करणारा गट व इतर अपक्षही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता वरीलपैकी प्रत्येकाची यंदा लढण्याची फुल्ल तयारी सुरु झालीय. पक्ष कोणताही असूद्या, यंदा मैदान मारायचंच, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मूड झालाय.

मोनिका राजळेंनी यंदा हॅट्ट्रीक केली, तर त्यांना मंत्रीपद फिक्स समजले जातेय. मात्र भाजप त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवेल का, हा प्रश्न आहे. दरवेळी होतो तसा यावेळीही त्यांना पक्षातूनच विरोध सुरु आहे, मात्र चंद्रशेखर घुलेंनीची अजित पवार गटाकडून फिल्डींग लावल्याने त्यांना महायुतीच्या तिकिटासाठीही संघर्ष करावा लागत आहे. महायुतीतील दोघांच्या याच भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल का, भाजप आपला गड राखील का, प्रताप ढाकणेंना यंदा तरी यश येईल का, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दोन दिवासंपूर्वी शेवगाव येथे येत आ. मोनिका राजळेंचं तोंडभरुन कौतूक केलं. मोनिकाताई यावेळी हॅट्ट्रीक करतील व पक्षाकडून मोठी जबाबदारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे यंदा निवडून आल्यास मोनिकाताईंना मंत्री होण्याची संधी राहिल, अशी हिंट त्यांनी भाषणातून अनेकदा दिली. आता शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर, निवडून येण्यापेक्षा उमेदवारी मिळविण्यासाठीच मोनिका राजळेंना जास्त संघर्ष करावा लागतो, असा इतिहास आहे.

२०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्येही संघर्षाने त्यांची पाठ सोडलेली दिसत नाही. यावेळी मात्र राजळेंना दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतोय. पक्षांतर्गत विरोध जास्त तीव्र झालाच आहे, मात्र यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुलेही महायुतीकडून इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून त्यांनी फिल्डींग लावली असली तरी, अनेकदा भाजपकडूनच त्यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज बाँम्ब काहीजण अधूनन-मधून टाकून देतात. यामुळे राजळेंची धडधड यावेळी जास्त वाढलेली दिसतेय.

मात्र काहीही असले तरी, गेल्या दहा वर्षात केलेली कामे, स्वच्छ पाटी आणि कार्यकर्त्यांशी थेट आपुलकी या जोरावर भाजप राजळेंनाच तिकीट देईल, असेही स्थानिक पत्रकारांचे अनुमान आहेत. या मतदारसंघात राजळेंसमोर यावेळी एक नवीनच डोकेदूखी आहे. ती म्हणजे मराठा-ओबीसी वाद. महायुतीकडील राजळे व घुले हे दोन्ही इच्छुक मराठा समाजाचे आहेत. तर महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे प्रताप ढाकणे हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. यापुर्वी या मतदारसंघात सर्वच समाजघटकांच्या पाठींब्यावर त्यांनी दोनदा आमदारकी मिळवली होती. यावेळी मात्र राजळेंना मराठा-ओबीसी हा वाद नवीनच आहे. त्यामुळे राजळेंना मराठा समाजातून जितका कमी विरोध होईल, तितक्या विजयाच्या संधी वाढणार आहेत. मात्र जर घुलेंनी बंडखोरी केलीच, तर मग दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याच्या संधीही वाढतील.

दुसऱ्या बाजूने विचार केला तर, मुंडे कुटुंबाला ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. मात्र पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते राजळेंच्या पाठीशी ठाम आहेत. शिवाय या मतदारसंघातला एक गठ्ठा ओबीसी मतदार हा कट्टर भाजपच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवार असूनही ओबीसी मतदार हा राजळेंमागे राहण्याच्या संधी वाढतात. परंतु मराठा उमेदवार असूनही राजळेंच्या मागे मराठा मतदार राहिल का, ही शंका आहे. मराठा समाजाचे दोन किंवा तीन दिग्गज उमेदवार उभे राहिल्यास, राजळेंना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मराठा वोटबँक, वंजारी वोटबँक, मुस्लिम-दलित वोटबँक या महत्त्वाच्या फॅक्टरवर या मतदारसंघातील हार-जीत अवलंबून असणार आहे. याशिवाय मुंडेंची यंत्रणा, लंके-विखे या आजी-माजी खासदारांच्या यंत्रणा, शरद पवारांची यंत्रणा या यंत्रणांचाही महत्त्वाचा रोल राहणार आहे. हे सगळं पाहता या मतदारसंघात राजळे, घुले व ढाकणे या तिघांनाही येथून विजयाच्या सारख्याच संधी आहेत.राजळेंना होणारा विरोध शमेल का, राजळे पुन्हा आमदार होतील का, ढाकणेंचं स्वप्न यावेळी पूर्ण होईल का… तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com