विधानसभा निवडणूक

शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी तीनही निवडणुकांत बौद्ध समाजाला उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर, अकोले येथील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा दिला आहे.

मागील निवडणुकीवरही कार्यकर्त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. यावेळी मात्र आमचं ठरलंय, असा चंग बांधण्यात आला आहे. महाआघाडीने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याची मागणी बुधवारी अकोले येथे करण्यात आली होती.

शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठी असूनही डावलण्यात येते. यावेळी असा प्रकार घडला तर अलिप्त राहण्याचा अथवा ‘नोटा’चे बटन दाबण्याचा इशारा देण्यात आला होता. आता श्रीरामपुरात बौद्ध,

मातंग, मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, आदिवासी व ओबीसी समाजाची ऐक्य परिषद शनिवारी होत आहे. यातही प्रमुख पक्षांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया आहेत.

प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सर्वजण सहभागी होतात. बंधुभावाने वागतात. मात्र काही संकुचित मनोवृत्तीच्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी जातीय द्वेष व गैरसमज पसरविण्याचे काम केले आहे. बौद्ध समाजाचे सामाजिक व राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न आहेत.

मात्र बौद्ध समाजामध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत. प्रमुख पक्षांमध्ये काम करणाऱ्या तेथील निष्ठावंतांना तरी उमेदवारी द्यावी, अशी मागणी ऐक्य परिषदेत केली जाणार असल्याचे संयोजक सुभाष त्रिभुवन व संदीप मगर यांनी सांगितले.

यावेळी नक्की ठरलंय

मागील लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला डावलल्यानंतर बहिष्काराचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत अनेकांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याबाबत छेडले असता, संयोजक सुभाष त्रिभुवन यांनी यावेळी आमचं नक्की ठरलंय,

बौद्ध समाजाचा उमेदवार नसेल तर दोनशेपेक्षा जास्त उमेदवार देऊ. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची वेळ निवडणूक आयोगावर आणली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ahmednagarlive24 Office