महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर या लोकसभेच्या जागेसाठी मतदान झाले. सोबतच शिर्डीचेही मतदान झाले. निवडणूक सुरु झाल्यापासून तर मतदान होईपर्यंत नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी अगदी पायाला भिंगरी लावली होती.
आता मतदान होताच उडालेला हा धुराळा शांत झाला आणि सर्वानीच घटकेची विश्रांती घेतली. परंतु एकीकडे मतदान झाले असले तरी नेत्यांसह कार्यकर्ते या चुरशीच्या निवडणुकीमुळे टेन्शनमध्ये आलेत. आता आपल्या नेत्यांच्या विजयासाठी कुणी देव पाण्यात ठेवलेत तर कुणी देवाला नवस करत आहे.
निकालाआधीच फटाक्यांची आतषबाजी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे व नीलेश लंके यांच्यात सामना झाला. या लढतीकडे नगर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत लंके यांनी मोठे आव्हान उभे केले. त्यावरून उभयतांत मोठे आरोप-प्रत्यारोप झाले.
दोघांच्याही कार्यकत्यांनी विजयाचा दावा केला आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी लंके यांच्या विजयाचा दावा करीत कालच नगर शहरात फटाके फोडले. विखे समर्थकांनी लंके यांच्या पारनेर मतदारसंघातील सुपे येथे फटाक्यांची आतषबाजी केल्याचे समजते.
सोशल मीडियात विविध घोषणाबाजीचा महापूर
खासदार विखे समर्थकांनीही निवडणुकीनंतरही किल्ला लढवण्याचे थांबवलेले नाही. टीकेनंतर प्रतिटीका केली जात आहे. डॉक्टरने जालीम उपाय केलाय. गुलाल तर आमचाच, विजयाचा वादा, येणार तर दादा. फक्त लीड मोजा… असा विश्वास विखे यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
आमदार नीलेश लंके समर्थकांना विजयाची खात्री आहे. सोशल मीडियात त्यांच्या समर्थकांनी आताच जल्लोष करायला सुरवात केली आहे. लोकनेता, शंभर टक्के खासदार, आता मिशन दिल्ली, रामकृष्ण हरी वाजेल तुतारी. वाट बघा चार जून, अशा स्वरूपाचा मजकूर समर्थकांकडून पोस्ट केला जातोय.
सट्टा बाजार बाबतही चर्चा
दरम्यान प्रत्येक निवडणुकीनंतर एक गोष्ट प्रकर्षाने चर्चेत येते ती म्हणजे सट्टा बाजार. या निवडणुकीकडे राजस्थानमधील सट्टा बाजाराचेही लक्ष होते अशी चर्चा लोक करत होते. दरम्यान आता नगर शहरात कोणाला किती मतदान पडेल, यावरही सट्टा आहे.
दोघांत रंगलेल्या सामन्यात विजयाचा अंदाज बांधणे मुश्कील झाले आहे. परंतु सट्टाबाजाराने लंके यांच्या बाजूने अंदाज घेतला असल्याचे लंके यांचे कार्यकर्ते चर्चा करताना दिसतात. तर विखे यांचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देताना म्हणतात की ही अफवा असून सट्टा बाजारचा खरा कौल विखे यांना आहे अशी चर्चा हे लोक करतात. खरे काय ते ४ जून ला कळेल.