Kopargaon Assembly Election Result : आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आशुतोष काळे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लीड घेऊन आशुतोष काळे 1,23,838 मतांनी विजय मिळविला आहे. काळे हे महाराष्ट्रातून सर्वाधिक लीड घेऊन विजयी झाले आहेत.
कोपरगाव हा महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा आणि एक महत्त्वाचा मतदारसंघ. कोपरगावचं राजकारण म्हटलं की काळे विरुद्ध कोल्हे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो.
पण यंदा या मतदारसंघात काळे आणि कोल्हे हे परंपरागत विरोधक एकाच गटात होते. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे महायुतीकडून अजित पवार गटाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात होते.
विधानसभा निवडणुकीच्या सुरवातीला जेव्हा महायुतीकडून काळे यांना उमेदवारी दिली गेली त्यावेळी महायुती मध्ये समाविष्ट असणारे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे वेगळी भूमिका घेत शरद पवार गटात समाविष्ट होतील आणि काळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभे ठाकतील असे म्हटले जात होते.
पण भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कोल्हे यांची मनधरणी केली. यामुळे कोल्हे यांनी वेगळी भूमिका न घेता भाजपा मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोपरगावमध्ये प्रथमच काळे विरुद्ध कोल्हे असा सामना रंगला नाही.
महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे संदीप वर्पे हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
संदीप वर्पे हे मागच्या निवडणुकीत काळे यांचेच कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. पण, बदललेल्या राजकीय समीकरणानुसार संदीप वर्पे यांनी काळे यांना आव्हान दिले होते. मात्र, या लढतीत काळे यांनी विक्रमी मताधिक्क्यांनी विजय मिळवला आहे.
खरेतर, महाराष्ट्रात दोन वेळा झालेल्या सत्तांतरामुळे दोन्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांचे समर्थक असलेल्या आमदार काळे यांना मोठा लाभ झाला. त्यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश आले. परिणामी मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या रस्ते व विकास कामाना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून त्या समस्या सोडविण्यात आ. काळे यशस्वी झालेत. आमदार काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. यातून त्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवला. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मंजूर करून आणल्यात. महत्त्वाचे म्हणजे याची कामे सुद्धा प्रगतीपथावर आहेत.
मतदार संघातील प्रमुख रस्ते राज्यमार्ग जिल्हा मार्ग गेल्या पाच वर्षात आमदार काळे यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण झालेत. तसेच मतदार संघातील काही रस्त्यांची कामे मंजूर झाली असून लवकरच ती सुद्धा पूर्ण होणार आहेत. काळे यांनी विजेचे प्रश्न सोडवलेत अन गोदावरी कालव्यांचा प्रश्न काही प्रमाणात कमी केला. निळवंडे चे पाणी लाभक्षेत्रामध्ये आले, बंधाऱ्यासाठी संरक्षक भिंती मंजूर केल्यात. भुयारी गटारी योजना मंजूर करून आणली. आमदार काळे यांनी अशी अनेक प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण केली आहेत. एमआयडीसी उभारण्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मार्गी लावलाय. याकामी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे त्यांना नेहमीच पाठबळ मिळाले आहे.