महाराष्ट्रातील लोकसभेच्या अनेक जागांचे कौल आता हाती यायला लागले आहेत. त्यापैकी काही लक्षवेधी जागा होत्या. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यापैकी एक म्हणजे शिरूर. या मतदार संघात शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे व अजित पवार गटाकडून आढळराव पाटील हे उभे होते.
दरम्यान सध्याच्या आकडेवारीनुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याची चित्र आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 53949 मतांची आघाडी त्यांना मिळालेली होती. त्यामुळे आता हा फार मोठा फटका अजित पवार गटास व शिवाजीराव आढळराव पाटील यांना मानला जातोय.
दरम्यान अमोल कोल्हे यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केल्यानंतर हे माझ्या एकट्याचं यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलेय.
अजित पवार यांनी दिला होता दम
लोकसभा उमेदवारी जाहीर झाली व त्यानंतर अजित पवारांनी कसा निवडून येतो बघतोच असा दम दिला होता. परंतु आता अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारून विजयश्री खेचून आणल्याचे चित्र आहे.
काय फिरले गणित?
येथे सर्वात महत्वाचे म्हणजे अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ दिल्याने जनतेच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना मिळाला. तसेच शरद पवार व स्वतः कोल्हे यांच्या प्रचार सभाही झंझावाती झाल्या. तसेच आढळराव पाटील हे आयात उमेदवार असल्याने अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांनी त्यांचे मनापासून काम केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथे कोल्हे हेच विजयी होतील असे दिसत आहे.