Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने संपूर्ण देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुनच्या मध्यावर सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे.
दरम्यान 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुक आयोग मतदानाची प्रक्रिया पार पाडणार असून चार जूनला मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली असल्याने मतदारांनी लवकरात लवकर मतदार यादीत त्यांचे नाव आहे की नाही याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
जर मतदार यादीत नाव नसेल तर अशा 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भेट देऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवायचे आहे.
पण अनेकांना मतदार यादीत आपले नाव कसे पाहायचे याविषयी माहिती नाहीये. त्यामुळे आज आपण घरबसल्या मतदार यादीत नाव कसे शोधायचे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मतदार यादीत नाव कसे शोधायचे?
जर तुम्हालाही मतदार यादीत तुमचे नाव शोधायचे असेल तर यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
https://voters.eci.gov.in/ या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर असलेल्या search in electoral roll या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
आता तुम्हाला वेबसाईटच्या वरच्या बाजूला 3 पर्याय दिसणार आहेत. ‘Search By Details’, ‘Search By EPIC’, ‘Search By Mobile’ या पैकी तुम्हाला एका पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मग आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाकून ‘Search’ वर क्लिक करायचे आहे. मग खाली मतदार यादीत तुमचं नाव, EPIC Number इत्यादी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे.