Maharashtra Politics : बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा राहिला असल्याने महाराष्ट्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा संघर्ष असेल. या दोघींमध्ये लढत असली तरी खरी लढत ही शरद पवार व अजित पवार यांच्यात असणार आहे.
त्यामुळे अनेक जण सध्या पवार विरोधात पवार अशा संघर्षांने शॉकिंग झाले आहेत. परंतु हा संघर्ष आताच होतोय असे नाही. तब्बल 64 वर्षांपूर्वी देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना झाला होता. 1960 मध्ये लोकसभेच्या निवडणूक लागल्या. शरद पवार यांच्यावर त्याकाळची युवक काँग्रेसच्या सचिवपदाची जबाबदारी आली होती.
परंतु त्या लोकसभेला काँग्रेसच्या विरोधात शरद पवारांचे थोरले बंधू वसंतराव हे बारामतीतून उभे राहिले होते. अशा वेळी शरद पवार काय करणार, असा प्रश्न महाराष्ट्रालाच पडलेला होता. वसंतरावांनी ही अडचण समजताच शरद पवारांना फोन करून तुम्ही काँग्रेसच्या विचारधारेत असल्याने तुम्ही तुमचे काम करा माझ्या विरोधात प्रचारात संकोच करू नका असा निरोप दिला.
या निवडणुकीत शरद पवार यांनी आपली संपूर्ण ताकद वापरत काँग्रेसला विजय मिळवून देत आपल्या भावाचा निवडणुकीत पराभव केला होता.
दरम्यान आता तब्बल 64 वर्षांनी बारामतीत तशीच परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे व सून सुनेत्रा पवार एकमेकींच्या विरोधात उभे आहेत. यात शरद पवार आपली मुलगी सुप्रिया यांचा तर अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतायेत.
म्हणजेच पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत असून पवार विरोधात पवार अशी लढत रंगणार आहे. बारामतीत तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून निकाल ४ जून ला लागेल. सध्या ही निवडणूक पक्ष आणि कुटुंब तोडण्याच्या भावनिक मुद्द्यावर रंगलेली आहे.
सून आणि मुलगी समोरासमोर आणणे, शरद पवारांचे कुटुंब तुटणे आदी मुद्दे या निवडणुकीत असून मोदींची गॅरंटी, राममंदिर असे मुद्दे येथून गायब झाले आहेत.