Mharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पक्षांची फोडाफोडी, एकनिष्ठतेची कमी, विकासापेक्षा जातीय गणिते आदी गोष्टी सध्या राजकारणात आणल्या जात असल्याचे चित्र आहे. तसे हे चित्र काही आजचे आहे असे नाही. याआधीही असे प्रयोग झाले असतील फक्त चेहरे वेगळे असतील.
दरम्यान आता महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा पगडा दिसून येतो. त्यातच आता बारामती मध्ये पवार विरोधात पवार अशी लढत उभी ठाकली आहे. त्यामुळे शरद पवार यांना बारामतीत शह देण्यासाठी व एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय गणिते फिरवण्यासाठी महायुतीने एक मोठा राजकीय डाव टाकला असल्याचे बोलले जात आहे.
हा डाव मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मध्ये लोकसभेची उमेदवारी देऊन टाकण्यात येईल असे जाणकार सांगत आहेत. नाशिकमध्ये सध्या शिंदे गट, भाजप, व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. यात आता छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. बारामतीमधील माळी आणि ओबीसी मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने ते मतदान महायुतीकडे वळवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून दिल्लीश्वरांकडून छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील उमेदवारीचा घाट घातला असल्याचे बोलले जात आहे.
यातून केवळ बारामतीचे नव्हे तर शिरूर, मराठवाड्यामधील बीड, छत्रपती संभाजीनगर आदींसह राज्यातील अन्य ठिकाणचा माळी समाज महायुतीकडे वळवणे हाच एक उद्देश असावा असे म्हटले जात आहे.
मोठ्या पवारांच्या साम्राज्याला हादरा देण्यात भुजबळांची भूमिका
एका मीडियाने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की, अजित पवारांच्या बंडामध्ये भुजबळांची भूमिका मोठी असून शरद पवारांच्या साम्राज्याला हादरा देण्यातही ते आघाडीवर होते व त्यामुळेच दिल्लीश्वर हायकमांडचा त्यांच्यावर विश्वास वाढला आहे.
‘माधव’ समीकरण जुळवण्याची धडपड
सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा असून भुजबळांच्या रूपाने माळी, पंकजा मुंडेंच्या रूपातून वंजारी तर महादेव जानकरांच्या रूपातून धनगर नेत्यांना संधी दिल्याने यातून भाजप ‘माधव’ समीकरण जुळवण्याची धडपड करत असल्याचे बोलले जात आहे. यातून राज्यभर तर उपयोग होईलच पण सर्वात जास्त बारामती, शिरूर, बीड आदी ठिकाणी फायदा व्हावा हेच गणित महायुतीचे असावे असे म्हटले जात आहे.