विधानसभा निवडणूक

Maharashtra Vidhan Sabha 2024: राज्यात सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडी मुस्लिम मतदारांना घालणार पायघड्या की बनवणार मुस्लिम उपमुख्यमंत्री?

Published by
Ajay Patil

Maharashtra Vidhan Sabha 2024:- गेल्या काही दिवसांअगोदर पार पडलेली लोकसभेची निवडणूक आणि आता नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जर बघितल्या किंवा या निवडणुकींचा आलेला निकाल जर बघितला तर इंडिया आघाडी अर्थात काँग्रेसच्या मागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार उभे राहिल्याचे दिसून आले.

कारण बऱ्याचदा असे म्हटले जाते की मुस्लिम मतदार हा भाजपला कधीच मतदान करत नाही व ही बाब तितकीच खरी असल्याचे आपल्याला जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांवरून दिसून आले. लोकसभा निवडणुकीचे जर आपण एकंदरीत विश्लेषण केले तर बऱ्याच लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे दिसून आले व ते मतदान देखील एक गठ्ठा स्वरूपाचे होते.

याचे जर उदाहरण घ्यायचे झाले तर धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे यांचा पराभव काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी केला व या भाजपाच्या पराभवामध्ये जर प्रमुख कारण पहिले तर महाविकास आघाडीला या मतदारसंघातून मुस्लिम मतदारांनी भरघोस मतदान केले.

अशाच प्रकारचे मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने ईशान्य मुंबई व उत्तर मध्य मुंबईत आपल्याला दिसून आले. त्यामुळे आता मुस्लिम मतांसाठी महाविकास आघाडी भविष्यात वेगळ्याच प्लॅनिंग मध्ये असून एखाद्या वेळेस जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुस्लिम उपमुख्यमंत्री बनवला जाणार? अशा पद्धतीचे चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये दिसून येत आहे.

 जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीतील स्थिती

नुकत्याच पार पडलेल्या जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील स्थिती बघितली तर या ठिकाणी देखील मुस्लिम मतदारा हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसून आले.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जे आमदार निवडून आले त्यातील एकही आमदार हिंदू किंवा बौद्ध धर्मीय नसून सगळे निवडून आलेले सहा आमदार मुस्लिम समाजाचे आहेत व यावरून आपल्याला काँग्रेसच्या बाजूने असलेले मुस्लिम मतदारांचे स्वरूप स्पष्ट होते.

अगदी त्याच पद्धतीची स्थिती हरियाणामध्ये देखील दिसून आली. हरियाणा विधानसभेमध्ये काँग्रेसने 36 जागा जिंकल्या व या 36 जागा मुस्लिम मतदारांच्या एक गठ्ठा मतदानामुळेच जिंकणे शक्य झाले.

उदाहरणच घ्यायचे झाले तर हरियाणा मधील पुनाहाना,नुह आणि हथिन या मतदारसंघांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदान मिळाले.

त्यामुळे हीच स्थिती महाराष्ट्रमध्ये देखील असल्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे काँग्रेसवर विरोधी पक्षांकडून काँग्रेस ही नवीन मुस्लिम लीग झाली असल्याची टीका देखील केली जात आहे.

 महाराष्ट्रमध्ये काँग्रेस मुस्लिम मतांवर ठेवणार डोळा?

काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुस्लिम, जाट आणि दलित अशा पद्धतीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नांना मात्र भाजपमुळे यश मिळाले नाही. या सगळ्या राजकारणामध्ये भाजपला जाट आणि दलित बहुल भागामध्ये चांगले मतदान झाले.

परंतु ज्या ठिकाणी मुस्लिम मतदान जास्त होते त्या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून आले. अशाच पद्धतीची स्थिती जम्मू मध्ये देखील दिसून आली. ज्या ठिकाणी हिंदूबहुल भाग आहे त्या ठिकाणी भाजपला चांगली साथ मिळाली तर काश्मीर खोऱ्यामध्ये मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला  चांगली मदत झाली.

ही सगळी परिस्थिती पाहता आता महाराष्ट्र काँग्रेस देखील या निवडणुकीत मुस्लिम मतांवर डोळे ठेवून त्या पद्धतीची प्लॅनिंग बनवत असल्याचा अंदाज भाजपच्याच काही नेत्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे.

 उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांवरच

अवलंबून राहावे लागत आहे का?

शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेनेचा मतदार देखील आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे शिवसेना यांच्यामध्ये विभागला गेलेला आहे. महाविकास आघाडीतील जे इतर घटक पक्ष आहेत त्यांचे आता धोरण काँग्रेस सारखेच राहिलेले दिसून येत आहे.

शिवसेनेच्या दृष्टिकोनातून बघितले तर शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा जो काही हिंदू मतदार होता तो आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांवरच अवलंबून राहावे लागत आहे व त्या पद्धतीची टीका उद्धव ठाकरे गटावर देखील केली जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई शहरातून मुस्लिम मतदारांनीच मशालीला अधिक साथ दिल्याचे दिसून आले.मुंबईचे मुस्लिम जास्त असलेला भाग बघितला तर यामध्ये आपण मानखुर्द तसेच गोवंडी, शिवाजीनगर, मुंबादेवी व भायखळासारख्या  मुस्लिम जास्त असलेल्या पट्ट्यातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त मतदान झाले

व इतकेच नाही तर मुस्लिम बहुल भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. या सगळ्या परिस्थितीवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे या माध्यमातून दिसून येते.

 या गोष्टी येऊ शकतात महाविकास आघाडीच्या अंगलट?

महाविकास आघाडीच्या माध्यमातून रामगिरी महाराजांच्या अटकेची करण्यात आलेली मागणी तसेच नितेश राणे यांच्या अटकेची मागणी व वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध इत्यादी बाबी महाविकास आघाडीच्या अंगलट येतील असे देखील बोलले जात आहे.

त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर मुस्लिम मतदार एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने येण्याकरिता एखाद्या वेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पद मुस्लिम समाजाला देण्याची नीती महाविकास आघाडीच्या  माध्यमातून निश्चित असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Ajay Patil