विधानसभा निवडणूक

“मोदीजी कांद्यावर बोला”..! नाशिकमध्ये मोदींच्या सभेत घोषणाबाजी, भाषण थांबवलं, जय श्रीराम म्हणत प्रोत्साहित केलं, पण घोषणा थांबेनात अखेर आटोपत घेतलं…

Published by
Ahmednagarlive24 Office

नाशिक मधून एक महत्वपूर्ण राजकीय बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. परंतु या सभेत त्यांचे भाषण सुरु असताना अचानक मोदी यांनी भाषण थांबवले.

अनेकांना नेमकं कारण कळेना पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करताच भाषण पुन्हा एकदा सुरु झाले.

नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ ही सभा संपन्न झाली. यावेळी मोदी यांनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीकास्त्र सोडले.

त्यांचा नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना असा उल्लेख करत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले. दरम्यान मोदींच्या सभेत उत्साह दिसून येत होता, लोक मोदी-मोदी घोषणा देखील देत होते.

मोदी यांचे भाषण देखील उत्साहात सुरु होते. पण हे सुरु असताना अचानक प्रेक्षकांमधून “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी ऐकू यायला लागली. त्यामुळे लक्ष विचलित झाल्याने मोदी क्षणभर थांबले. प्रेक्षकांमध्ये चुळबूळ निर्माण झाली आणि मग घोषणाबाजी होतेय हे लक्षात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम असा नारा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी मग पुन्हा भाषणाला सुरुवात केली. पुढे ते आपल्या योजनांची माहिती द्यायला लागले आणि कांदा उत्पादकांसाठी आपण काय काय केले हे देखील सांगितले.

परंतु हे सुरु असतानाच प्रेक्षकांमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरुच असल्याने मोदींनी इतर सभांपेक्षा कमी वेळेत आपलं भाषण उरकले असल्याची चर्चा सध्या येथे रंगली आहे.

Ahmednagarlive24 Office