Shirdi Lok Sabha : भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं- रासप- मनसे मित्र पक्षांबरोबरच अदृष्य हातांची खा. सदाशिव लोखंडे यांना मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, असा आत्मविश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
कोपरगाव येथे बुधवारी (दि. १ मे) लोकसभा उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री विखे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आ. आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिद्र बर्डे, रा. कॉ. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे,
तालुकाप्रमुख मीनाक्षी वाघचौरे, उपतालुकाप्रमुख आरती गाढे, सायरा सय्यद, स्मिता हंडे, विजया धोंड, उषा दुशिंग, विनायक गायकवाड, सुशांत खैरे, वसंत जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीनराव औताडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात, संजय गुरसळ, जाधव, अभिषेक आव्हाड यांच्यासह भाजप मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे म्हणाले, मोदी सरकारने अनेक लोकांना अनेक योजनांचा लाभ दिला आहे. नुकसान भरपाई दिली आहे. अवकाळी, गारपीट, दूध या सर्वांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहे. कोपरगावची जबाबदारी आ. काळे यांनी घेतलेली आहे. ही निवडणूक खा. लोखंडेंसाठी नसून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीची आहे, असे ते म्हणाले.
खा. लोखंडे म्हणाले, मी दहा वर्षांत भरपूर कामे केली. मागील खासदाराला पाच वर्षे स्वतःचा निधीसुद्धा वापरता आला नाही. त्यांचा शिल्लक राहिलेला दीड कोटी निधी आपण वापरला. निळवंडेचा पाठपुरावा केल्याने ५४ वर्षांनंतर निळवंडेचे पाणी लोकांना मिळाले. जलदिंडी काढली लोकांना पाणी मिळवून दिले.
आ. काळे यांनी खा. लोखंडे यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य राहील. कोपरगावची जनता सुज्ञ असून विरोधकांच्या भूल थापांना बळी पडणार नसल्याचे सांगितले. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितिन औताडे यांनी केले. आभार रावसाहेब थोरात यांनी मानले.