विधानसभा निवडणूक

श्रीरामपुरात नवा भिडू मैदानात ! विकासासाठी रोड मॅप गरजेचा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औद्योगिकीकरण वाढल्याने दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहरं चकचकीत होण्यापेक्षा बकाल अन् गावांचं गावपण संपत चाललं आहे. अशा परिस्थितीत गाव असो किंवा शहर दोन्ही ठिकाणी शाश्वत विकास करायचा असेल, तर विकासाचा रोडमॅप गरजेचा आहे. ही रोखठोक भूमिका मांडली आहे, युवा नेते रोहीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी.

रोहीत यांना राजकारणापेक्षा समाजकारण, संघटनाचे धडे वडील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून मिळाले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी रोहीत यांनी जनतेशी संवाद साधला आहे. तेव्हा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ज्या प्रश्नांचं आकलन त्यांना झालं, त्या विषयीची त्यांनी भूमिका त्यांच्याच शब्दात समजून घेऊ या.

राज्याच्या साखर कारखानदारीला दिशा देणारं शहर म्हणजे श्रीरामपूर; परंतु आज हेच शहर व इथली शेती हक्काचे पाणी नसल्याने अडचणीत आहे
त्यामुळे श्रीरामपूरकरांना हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर एम.आय.डी.सी. असलेला श्रीरामपूर एकमेव विधानसभा मतदारसंघ; परंतु इथली एम.आय.डी.सी. विस्तारू शकली नाही.

आजारी कारखाने, बंद पडलेले कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी हे प्रश्न लक्षात घेऊन एम.आय.डी.सी.च्या पुनर्विकासाची खऱ्या अर्थाने गरज आहे. ती केल्यास श्रीरामपूर एम.आय.डी.सी. उत्तर नगर काय, जिल्ह्यातील युवकांना रोजगार देऊ शकेल. श्रीरामपूर शहरासह तालुका व राहुरी तालुक्याला जोडलेल्या ३२ गावांत
रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत.

ते सोडविण्यासाठी शासनाच्या योजना कागदोपत्री नव्हे, तर प्रामाणिकपणे राबवाव्या लागतील. तरच ग्रामीण भागातील जनतेचे जगणे सुखकर होऊ शकेल. गाव पातळीवर विजेचा प्रश्न गंभीर आहे. शासनाने दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याची घोषणा केली; पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय ?

महिला सशक्तीकरणासाठी व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत फक्त स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाऐवजी आता थेट या विषयाचा तास सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी तालुक्याच्या प्रत्येक शाळेने व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याचबरोबर उच्च शिक्षणासाठी शासकीय पातळीवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय अशा महाविद्यालयांची आवश्यकता आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना पाठबळ दिल्याशिवाय युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कमी होणार नाही. श्रीरामपूर शहरातल्या बोरावके महाविद्यालयाने आजवर अनेकांना घडविले, पण आता काळ सुसंगत अभ्यासक्रम व व्यावसायिक शिक्षणासाठी शासन पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

श्रीरामपूर असं शहर आहे, की ज्या शहराने राज्याचे राजकारण बदलवणारे नेतृत्व दिले. इथली जनता अत्यंत जागरूक आहे. ती विकासासाठी परिवर्तनाला साथ देणारी आहे. उत्तर नगरमधील सर्वात मोठे शहर फक्त लोकसंख्येच्या अंगाने नव्हे, तर तर सुविधा, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व आघाड्यांवर पुढारलेल्या श्रीरामपूरला आता डिजिटल युगात काळसुसंगत मेकओव्हरची गरज आहे.

त्यासाठी योग्य नेतृत्वाला संधी दिल्यास विकासाचा रोडमॅप बनू शकेल आणि त्याची अंमलबजावणीही तितक्याच ताकदीने होईल. म्हणून गरज आहे, समाजकारणातून राजकारणात येऊ घातलेल्या माझ्यासारख्या युवकांना साथ देण्याची. ती साथ श्रीरामपूरकरांची मला मिळेल, अशी आशा – युवा नेते रोहीत भाऊसाहेब वाकचौरे

अहमदनगर लाईव्ह 24