विधानसभा निवडणूक

बारामतीतील गोंधळानंतर निलेश लंके समर्थक सावध, स्ट्रॉग रूमबाहेर ठोकला तंबू, चोवीस तास ठेवतायेत करडी नजर

Published by
Ahmednagarlive24 Office

लोकसभेचा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. यात अहमदनगर लोकसभेची निवडणूक देखील झाली. दरम्यान बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेथील कॅमेरे काही काळासाठी बंद झाले होते. यावरून आता निलेश लंके समर्थकांनी अहमदनगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे.

मतदानानंतर ईव्हीएम ज्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवले आहेत त्याबाहेर चोवीस तास पहारा सुरू केलाय.अहमदनगर, शिर्डी येथील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी ३ हजार ७३४ मतदान यंत्रे नगर एमआयडीसीतील वखार महामंडळात सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत.

केंद्र, राज्य व स्थानिक पोलिस अशी थ्री लेयर सुरक्षा व्यवस्था या गोदामाभोवती तैनात केली गेली आहे. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलिस अधीक्षक राकेश ओला हे चोवीस तासांतून दोन वेळा ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमला व्हिजिट करत आहेत. या परिसरातील वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. अशी तगडी सुरक्षा प्रशासनाने केली आहे.

आता महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचे समर्थक स्ट्राँग रूमबाहेर तंबू देऊन चोवीस तास पहारा देत आहेत. त्यांच्यासाठी निवडणूक विभागाने सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीन उपलब्ध करून दिले आहे.
१३ मे रोजी मतदान झाल्यानंतर सर्व प्रथम नगर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे वखार महामंडळात पोहोच झाली.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुक्यातून मतदान यंत्रे पोहोचली. मतदान झाल्यानंतर ग्रामीण भागातून ईव्हीएम मशीन प्रथम तालुक्याच्या ठिकाणी आणली गेली. तिथून एकत्रिपणे नगरच्या वखार महामंडळाच्या गोदामात पोहोच करण्यात आली.

अशी आहे सुरक्षा
पहिल्या टप्प्यात केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान, त्यानंतर राज्य राखीव दलाचे जवान आणि तिसऱ्या स्तरात स्थानिक पोलिस तैनात आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मतदान यंत्रे ४ जूनला मतमोजणीसाठी उघडली जातील.

Ahmednagarlive24 Office