विधानसभा निवडणूक

महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद पडली नाही, लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहाणार – राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहीणींनी महायुती सरकारच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. रक्षा बंधनाच्या पुर्वेसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहीणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून व्यक्त केला, निमित्‍त होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात आयोजित केलेल्या लाडक्या बहीणींशी संवादाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहीणींशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्‍तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महीलांनी प्रवरानगर येथे डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, उत्‍तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सरचिटणीस नितीन दिनकर, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व बहीणींच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना सन्मानित करून महायुती सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकार देणारे सरकार आहे. आजपर्यत महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद पडली नाही. लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहाणारी आहे. यासाठी आर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. या योजनेमुळे राज्यातील महीलांचा सन्मान अधिकच वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या योजनेला विरोधक जाणीवपुर्वक विरोध करीत होते. त्यांना न्यायालयाने फटाकरले, त्यामुळे बहीणींसाठी सुरू केलेली योजना कधीही बंद पडणार नाही आशी ग्वाही देवून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता योजनेच्या माहीतीसाठी आणि त्यातील त्रृटी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरची उपलब्धता करून देणार असल्याचे विखे पाटील यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील सर्व अंगवणवाडी सेविकांसह, ग्रामसेवक, आशा सेविका यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे नऊ लाख महीलांना या योजनेचा लाभ मिळू शकला. त्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विद्यार्थीनींकरीता मोफत शिक्षण आणि जेष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना सुरू करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारची असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजनेला दिलेली मुदतवाढ आणि राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेमुळे सामान्य माणसाला मोठा आधार मिळाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी लाडक्या भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी आता प्रत्येक बहीणीची असून महायुती सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ महीलांना मिळत असल्‍याचे त्‍यांनी सांगिमले. याप्रसंगी भाजपाच्या महीला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे, सौ.उमाताई वहाडणे, सौ.सोनाली नाईकवाडी यांच्यासह अनेक महीलांनी आपली मनोगत व्यक्त केली.

रक्षा बंधनच्या पुर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व बहीणींनी मंत्री विखे पाटील यांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित महीलांची संख्या पाहून सौ.शालीनीताई विखे पाटील यांनाही ना.विखे यांच्या समवेत सर्व सभागृहातील महीलांचा व्यासपीठावरून सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील जयश्री रामराव सिनगर या बहीणीस संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमात मिळाली.

अहमदनगर लाईव्ह 24