Panjabrao Dakh News : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील अनेक जागांवर आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. अजूनही काही जागांवर राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. परंतु लवकरात लवकर सर्वच राजकीय पक्ष आपले अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.
दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक ही खूपच रंजक होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील यंदा खूपच काटेदार होणार असे चित्र तयार होत आहे.
कारण की परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिलेली आहे. खरेतर पंजाबराव हे महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय आहेत. ते शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देतात. यामुळे त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येतो.
विशेष म्हणजे त्यांचे हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. भारतीय हवामान खात्यापेक्षा त्यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या आपल्या राज्यात अधिक आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
शेतकरी सांगतात की, पंजाबरावांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आता पंजाबरावांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे.
त्यांनी आधी परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र वंचित बहुजन आघाडीने त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि यानुसार त्यांनी आता उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीबाबत देखील माहिती दिलेली आहे. अशा परिस्थितीत आज आपण जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबराव डख यांच्याकडे किती संपत्ती आहे ?
डख यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार, त्यांच्याकडे फक्त 10 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 लाख रुपयांची एफडी अर्थातच मुदत ठेव आहे. त्यांच्याकडे बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि स्प्लेंडर या गाड्या आहेत ज्याची एकूण किंमत 2,30,000 रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
तसेच त्यांच्याकडे सोने सुद्धा आहे. त्यांच्याकडे जवळपास दीड तोळे सोने अन पत्नीकडे एकूण दहा तोळे म्हणजे 100 ग्रॅम असे एकूण साडे अकरा तोळे सोने आहे ज्याची किंमत जवळपास 7 लाख रुपये आहे.
त्यांच्याकडे एकूण 23 लाख 17 हजारांची अन त्यांच्या पत्नीच्या नावावर 80 लाखांची मालमत्ता आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. थोडक्यात त्यांच्याकडे अन त्यांच्या पत्नीकडे अशी सामायिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता आहे.