Maharashtra Politics : महाराष्ट्रातील अनेक लढतींपैकी बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक अत्यंत दिलचस्प बनत चालली आहे. आजवर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार हे दोघे उमेदवारी अर्ज भरणार व त्यांच्यातच लढती होणार या अटकळी बांधल्या जात होत्या.
त्याच दृष्टीने सर्व तयारी सुरु होती. दरम्यान आता यात आणखी एक ट्विस्ट आल्याने ही लढत आणखी रोचक होईल का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचे झाले असे की, स्वतः अजित पवार व रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार या दोघांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे.
त्यामुळे हे दोघेही उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे ही लढत नेमकी सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे – अजित पवार, अजित पवार-सुनंदा पवार नेमकी कशी लढत होणार याचीच चर्चा सुरु आहे.
सुनंदा राजेंद्र पवार –
शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून अर्ज घेतला आहे. भीमथडी जत्रा आणि बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुनंदा पवार यांचा दांडगा संपर्क आहे.
त्यांचे काम व महिलांशी असणारा सुसंवाद यामुळे त्या जिल्हाभर परिचित आहेत. आता लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज त्यांच्या नावाने नेल्याने लोकसभेसाठी सुनंदा पवार यांचे नाव समोर येत आहे.
अजित पवार –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानेही उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने चर्चाना उधाण आले आहे. ते देखील उमेदवारी अर्ज महायुतीकडून भरतील अशी माहिती समजली आहे. त्यामुळे आता या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
खबदारी म्हणून हे अर्ज
उमेदवारी अर्ज कोणत्या कारणामुळे बाद झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळल्या तर पर्यायी अर्ज म्हणून डमी उमेदवार दिला जातो. त्यामुळे सुनंदा पवार व अजित पवार यांचे हे डमी अर्ज असणार आहेत.
जर सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर पर्यायी अर्ज म्हणून सुनंदा राजेंद्र पवार यांचा अर्ज व तसेच सुनेत्रा पवार यांच्या अर्जात काही अडथळे आले तर पर्याय म्हणून अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज असणार आहे.