Political News : सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी यांत सामना रंगणार आहे. दरम्यान महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुरूच असून आता बहुचर्चित नाशिक जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. येथे छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही ते जाहीर होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाली परंतु एका उमेदवारीमुळे काही दूरगामी परिणाम होऊ शकतात असा राजकीय अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. काय होऊ शकतात राजकीय परिणाम ते जाणून घेऊयात –
मराठा समाजाची नाराजगी
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत केलेला विरोध सर्वश्रुत आहे. तसेच मनोज जरांगे यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे मराठा समाजाची मते राष्ट्रवादी व महायुतीवर नाराज होऊ शकतात असा एक अंदाज आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी याबाबत याआधीही शंका उपस्थित केलेली आहे. त्याचा परिणाम इतर मतदार संघावरील उमेदवारांवरही होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
ओबीसी मतांचा फायदा
भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे महायुतीला अनेक ठिकाणी ओबीसी मते मिळण्यास फायदा होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही मते निर्णायक होऊन निकालांमध्ये त्याचा परिणाम जाणवू शकतो.
शिंदे गटात बंडाळी
दरम्यान ही जागा विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेचे असूनही येथील जागा शिंदे गटास मिळाली नाही. त्यामुळे गोडसे नाराज आहेत. तसेच शिंदे यांच्या सोबत आलेल्या लोकांमध्ये यामुळे वेगळा संदेश जाऊ शकतो. विधानसभेला यापेक्षा बिकट स्थिती शिंदे गटाची होईल अशी एक भीती सध्या सर्वत्र व्यक्त हा होत आहे. तसे झाले तर या एका उमेदवारीमुळे शिंदे गटात बंडाळी होऊ शकते असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे.