अहमदनगरसह राज्यातील राजकीय वातावरण सध्या कसे आहे हे आपण सर्वचजण पाहत आहोत. उमेदवारांची संपत्ती, त्यांचे श्रीमंती, नव्हे नव्हे तर त्यांच्यासोबत फिरणाऱ्यांचीही काही मिजास कमी नसते. अगदी कोपरापर्यंत हात ओले होतात कार्यकर्त्यांचे.
पण जर थोडं मागे ४०-५० वर्षांपूर्वीच्या काळात डोकावले तर कालच्या व आजच्या राजकीय स्थितीमध्ये मोठा बदल झाला असल्याचे लक्षात येईल. त्याकाळचे साधे उमेदवार व भोळे कार्यकर्ते असे काहीसे चित्र होते.
निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी अगदी दवंडी देऊन निवडून आलेल्या आमदाराला शोधून ते सांगावे लागले होते असा इतिहास आहे. सध्या उमेदवारांचा थाट एकीकडे तर कार्यकर्त्यांच्या दर्जानुसार त्याच्याकडे चारचाकी वाहन असते.
त्याकाळात भल्या पहाटे उठून शिदोरी बरोबर घेऊन सायकलवर प्रचाराला ही मंडळी बाहेर पडायची. दुपारच्या वेळी मग एखाद्या शेतातील घनराट वृक्षाच्या सावलीखाली अंगतपंगत धरून सर्व डबे फस्त व्हायचे.
पोट भरले की, पुढच्या प्रचारावर निघायचे. एकेका गल्लीत घुसून बैठका घेऊन प्रचार साधायचा. त्याच्या अडीअडचणीची विचारपूस करून त्या मार्गी लावण्याबाबत नियोजन करायचे असा प्रचार साधला जायचा. रात्री उशिरा आपापल्या घरी ते उद्याचे नियोजन करून परतायचे.
फार दूरवर असल्यास एखाद्या सग्यासोयऱ्याच्या खळवाडीत पिठलं भाकरीचा पाहुणचार घेऊन रात्री परत जवळपासच्या मंडळींना एकत्र करून प्रचार साधायचा असा कार्यक्रम असे.
दवंडी देऊन शोधला आमदार
अलीकडच्या काळात मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला राजधानी गाठायची असते. किंबहुना बहुमताचा अंदाज घेत तो अन्य कोणाच्या गळाला लागू नये यासाठीच पक्षाकडूनच आघाडीवर असलेल्या उमेदवाराला पाचारण केले जाते.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र माजी दिवंगत राज्यमंत्री बाबुराव भारस्कर यांचे स्मरण होते. निकालानंतर विजयी झालेल्या भारस्करांना चक्क गावोगावी दवंडी देऊन शोधावे लागले होते. अखेर शासकीय यंत्रणेने त्यांना शोधून त्यांना उद्या सकाळी मंत्री पदाची शपथ घ्यावयाची असल्याचा निरोप दिला.
भारस्करांनीही रात्रीची रेल्वे पकडून मुंबई गाठली होती. विशेष म्हणजे शपथ विधीसाठी जरा बरे कपडे असावेत पण तेही नव्हते म्हणून एका मित्राच्या कपड्यावरच त्यांनी शपथ घेतली होती. आज निवडणुकीवर कोट्यवधीचा खर्च करण्यात येत असल्याचे आपण पहातो. त्यावेळी भारस्कर यांचा खर्च अवधा १०० रुपये होता असे सांगितले जाते.