विधानसभा निवडणूक

प्रमोद महाजनांची मुलगी पूनम महाजनांचा पत्ता कट करत उज्वल निकम यांनाच उमेदवारी का ? महाराष्ट्रात ‘या’ जागेंवर होणार फायदा, भाजपचे राजकीय गणित

Published by
Ahmednagarlive24 Office

भाजपने सध्या महाराष्ट्रात लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी विविध प्रयोग राबवले आहेत. अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कट करत अनेक नवीन व चकित करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

दरम्यान सध्या मुंबई मधील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात भाजप वाढवणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करत तेथे ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यामुळे सगळेच अचंबित झाले.

निकम यांचा सामना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी रंगताना दिसेल. दोनदा खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारत निकम यांना उमेदवारी का दिली असावी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

६२८ आरोपींना जन्मठेप व ३७ जणांना फाशी
उज्वल निकम यांचे वकिलीमध्ये असणारे काम हे सर्वपरिचित आहे. संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. १९९३ मधील बॉम्बस्फोट खटला, मुंबईमधील अतिरेकी हल्ल्याच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिल्याने देशभर त्यांचे नाव चर्चेत आले.

अहमदतगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या अत्याचार व खून खटल्यातही ते विशेष सरकारी वकील होते. अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी आजवर ६२८ आरोपींना जन्मठेप आणि ३७ जणांना दहशतवाद आणि अत्याचारासारख्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे.

उज्वल निकम यांनाच उमेदवारी का?
सुरवातीला भाजपने येथे उमेदवार घोषित केला नव्हता. ज्यावेळी काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्यारूपाने उमेदवार दिला त्यावेळी त्यानुसार राजकीय गणिते आखली. त्यांनी पूनम महाजन यांचा पत्ता कट केला. यामागे तेथील पूनम महाजन यांच्याविषयी आलेला सर्व्हे हे देखील कारण असावे असे म्हटले जात आहे.

त्याचप्रमाणे उज्वल निकम हा एक स्वच्छ व चारित्र्यवान चेहरा आहे. कुठेही भ्रष्टाचाराचा बट्टा त्यांच्यावर नाही. याचा फायदा प्रचारात भाजप होऊ शकतो हे देखील एक गणित असावे.

त्याचप्रमाणे निकम हे मूळ महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याने उत्तर महाराष्ट्रातील काही जागांवर त्यांना उमेदवारी दिल्याचा फायदा भाजपला होऊ शकेल असाही एक अंदाज या उमेदवारी देण्यामागे बांधला जात आहे.

 

Ahmednagarlive24 Office