Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवारांसाठी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कंबर कसली आहे.
उत्तरेतील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी देखील शिंदे गट शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित दादा यांच्या गटातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रचाराला नुकतीच सुरुवात केली आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोखंडे यांचा प्रचार सुरु केलाय. त्यांनी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन केले आहे आणि लोखंडे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी विखे पाटील यांनी शरद पवारांवर सडकुन टीका केली आहे. त्यांनी ‘मराठा समाजाला शरद पवारांनी पाठिंबा दिला नाही आणि आपली जातही सांगितली नाही.
पवारांनी आपली जात सांगावी म्हणून आमचा आग्रह नाही. मात्र, पवारांनी फक्त एक घोषणा द्यावी “एक मराठा लाख मराठा.” मात्र हे म्हणायला सुद्धा शरद पवार यांना शरम वाटते. मराठा आरक्षणावर पवार चुप्पी साधून असून भूमिका मांडायला तयार नाहीत,’ अशी जहरी टिका शरद पवार यांच्यावर केली आहे.
दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला आहे. ते म्हटलेत की, जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री फडवणीस यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवले. पण, महाविकास आघाडी सरकारच्या काळात घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवले.
तसेच त्यावेळी जाणता राजा (म्हणजे शरद पवार) हे रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचे, मराठा आरक्षण गेल्याचा कुठलाही पच्छाताप त्यांना झालेला नाहीये, असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावलेत.
दुसरीकडे, वर्तमान सरकारने म्हणजे शिंदे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असून हे आरक्षण दुसऱ्या कोणत्याच समाजाचे आरक्षण हिरावून घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.