अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवार घोषित केलेला आहे. खासदार सुजय विखे यांना भाजपने मैदानात उतरवलंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण यावर निलेश लंके यांच्या निमित्ताने गुढ निर्माण झालं आहे.
आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजून पर्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली नाही.
आमदार लंके हे शरद पवार यांना वारंवार भेटत आहेत. मात्र त्यांचा अजून अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जामखेड येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पत्रकारांनी उमेदवारी विषय छेडले.
पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न केला की तुतारी आपण हातात घेणार की लंके साहेब? यावर राणीताई लंके यांनी, या बाबत साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही. पण दोघांपैकी एक नक्कीच उमेदवार लंके घराण्यातला असेल, असे सांगितले.
पत्रकारांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला असता राणीताई लंके यांनी, लवकरच कळेल की तुतारी मी वाजवणार की लंके साहेब.. पण दोघांतून एक नक्की फिक्स आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असं बोललं जातंय. मात्र पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतः उमेदवारी करणार की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उमेदवारी करणार याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
तांत्रिक अडचणींमुळे आमदार निलेश लंके यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटातील अधिकृत पक्षप्रवेश रेंगाळला आहे. सुरू असलेल्या चर्चेनुसार आमदार निलेश लंके हे राजीनामा न देता स्वतः ऐवजी राणीताई लंके यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या विचारात आहेत.
मात्र खासदार सुजय विखे यांच्यासमोर तगडे आव्हान देण्यासाठी निलेश लंके यांनीच निवडणूक लढवावी, अशी शरद पवार गटाने सांगितले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लंके दांपत्यापैकी लोकसभेची उमेदवारी नेमकी कोण करणार याचीही उत्सुकता लागलेली आहे