महाराष्ट्र्रात लोकसभा निकालाचा ट्रेंड जवळपास समजू लागला आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, अर्थात महाविकास आघाडीची गणिते यशस्वी होताना दिसून येत आहेत. त्यात आता अजित पवार यांनी बंडखोरी केल्याने नेमके काय होणार याकडे लक्ष लागले असतानाच आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अगदी उत्सुकता लागलेल्या बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी घौडदौड करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना तब्बल 1 लाख 8 हजार 490 मतांनी मागे टाकले आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत झालेली असताना येथे बारामतीचा गड शरद पवारांनी राखला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तब्बल 1 लाख मतांनी याठिकाणी विजय मिळतील असा कल सध्या येथे दिसून येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने अजित दादांची जादू याठिकाणी चालली नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच महाराष्ट्रात रायगड वगळता सध्या कुठेही अजित पवार गटास आघाडी दिसून येत नसावी. त्यामुळे आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सत्ता स्थापनेसाठी शरद पवार प्रयत्नशील
सध्या इंडिया आघाडी देखील 250 जागेंच्या आसपास गेलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आता यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे किंगमेकर ठरणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग ज्यापद्धतीने केला होता तसा प्रयोग ते देशात करणार का याकडे लक्ष लागले आहे. कारण त्यांनी सध्या जो निकाल आहे तो सत्ता परिवर्तनास पोषक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सध्या NDA सोबत असणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूशी संपर्क केला असल्याचे समजते.
तसेच स्वतः काँग्रेसही नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी संपर्क साधेल अशी माहिती समजली आहे.