Sharad Pawar On Narendra Modi : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. सध्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागोजागी प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे असे म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील जनता कोणाला विजयाचा कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या माध्यमातून देखील जोरदार तयारी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
खरेतर, माढा लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ काल करमाळा येथे भव्य सभेचे आयोजन झाले होते. या जाहीर सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती.
याच जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. पवार यांनी दहा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता त्या दुष्काळात अमूलने चारा पाठवला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमूल कंपनीवर खटला भरवला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ते म्हटलेत की, ‘महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी मुक्या जनावरांना जगविण्यासाठी उसाचा वाढा, ऊसाची बांडी हाच चारा शिल्लक होता. पण, मुकी जनावरे उसाचे वाढे खात नव्हते. यामुळे मग त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने गुजरात मधील अमोल कंपनीकडे चारा पाठवण्याची विनंती केली.
या विनंतीला मान देऊन कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात दौरा आयोजित केला. येथे येऊन त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. मग त्यानंतर कंपनीने गुजरातमधून चारा पाठविला होता.
परंतु त्यामुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमूलच्या प्रमुखांवर खटला भरवला होता.’ यामुळे आता या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या या आरोपावर काय उत्तर देतात हे देखील विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.