Sharad Pawar : आज महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर बहुतांश काळ राजकारण हे पवार घराणे विशेषतः शरद पवारांभोवती फिरत राहिलेले दिसते. नुकताच अलीकडील काळ पाहिला तर भाजपने देखील आता आपला राजकीय विस्तार वाढवला आहे.
केंद्रात व राज्यातही भाजप मागील अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याभोवती राजकारण नेहमीच फिरत राहिलेलं दिसते. वयाच्या ३८ व्या वर्षी इंदिरा गांधी यांना शह देत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. ते ५० वर्ष राजकीय क्षेत्रात असून त्यांनी आजवर १४ निवडणुका जिंकलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील त्यांच्या वर्चस्वाचे महत्वाचे कारणांपैकी एक म्हणजे सहकारावर असणारा त्यांचा पगडा. सर्वात तरुण मुख्यमंत्री बनणारे व आपल्या कारकिर्दीत कवचात सोडले तर एकदाही निवडणूक न हरलेले शरद पवार यांच्या रक्तात राजकारण जन्मताच आहे असे म्हटले जाते.
विशेष म्हणजे जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांचे होते तेव्हापासून शरद पवार सभांना हजेरी लावू लागले होते असे म्हटले जाते. का म्हटले जाते असे? चला पाहुयात यामागील किस्सा..
अवघ्या तीन दिवसानंतर सभेला…
त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. काही मीडियात देखील याचा उल्लेख आलेला आहे. 12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म बारामतीत झाला. शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार हे होत व ते महाराष्ट्र सहकारी संस्थेत त्यावेळी अधिकारी होते.
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबरला झाला व 15 डिसेंबर 1940 रोजी त्यांच्या मातोश्री शारदा पवार यांना पुणे लोकल बोर्डात महत्त्वाची मीटिंग असल्याने तेथे जायचे होते. परंतु शरद पवार हे इतके लहान होते की त्यांना घरी एकटे सोडता येत नसल्याने त्यांची कुचंबणा झाली. मग त्यांच्या आई शारदा पवार यांनी शरद पवार यांनाही बैठकीला नेले.
त्यामुळे अवघ्या तीन दिवसांचे होते तेव्हापासून शरद पवार सभांना हजेरी लावू लागले होते असे म्हटले जाते. पुढे राजकीय जडणघडणीत त्यांचे वडील गोविंदराव यांनी शेतकऱ्यांमध्ये कसे मजबूत स्थान निर्माण केले हे पहिले व शेतकऱ्यांसाठी काम सुरु केले.
त्यानंतर त्यांना राजकारणातील सहकाराचे महत्व समजल्याने त्यांनी सहकार क्षेत्रात आपले वजन कायम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला.