महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. महायुतीमध्ये जागावाटप करताना शिंदे गट तसेच अजित पवार गटाच्या व काही ठिकाणी भाजपच्याही इच्छुकांच्या वाटेल ठेंगा मिळाला. दरम्यान काही जागांच्या बदल्यात भाजपने शिंदे गट व अजित पवार गटास काही शब्द दिले असल्याची चर्चा आहे.
आता शिंदे गटाच्या एका माजी खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला होता असे म्हटले आहे. शिंदे सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हा दावा केला असून त्याबदल्यात मी नवनीत राणा यांच्याविरोधात अर्ज मागे घेतला असे ते म्हणालेत. यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीमुळे युतीला फटका बसू शकतो, असे भाकितही वर्तवलेय.
आधी शिंदेसेनेचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारगे यांनी आरोप केला की, अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझे काम केले नाही. त्यानंतर शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी तगडे उमेदवार दिल्याने मविआला राज्यात चांगले यश मिळेल. मग अमरावतीचे शिंदेसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा निवडून येणार नाहीत,
असा दावा केला. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी आडसूळ यांना मर्यादेत राहण्याचा इशारा दिला. दरम्यान, शिंदेसेनेचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी अडसूळ, कीर्तिकरांची पक्षविरोधी कारवायांबद्दल हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
अडसूळ म्हणतात..
अडसूळ म्हणाले की, विरोधकांच्या एकजुटीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला नक्कीच फटका बसेल. मी एखाद्या पक्षाशी बांधील असलो तरी माझे वक्तव्य चुकीचे ठरणार नाही. राज्यात नक्कीच संघर्ष आहे. फार काही जास्त सांगता येणार नाही, पण एक आहे की, मविआने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे ही बाब मान्य करावी लागेल असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.