शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे.

एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी झुंज देण्यासाठी उत्कर्षा रूपवते यादेखील सज्ज असून त्यांना वंचित बहुजन आघाडीने यावेळी उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणजे शिर्डीची दुहेरी लढत आता तिरंगी झाली आहे. यामुळे शिर्डीची निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. तिरंगी लढतीमुळे संपूर्ण राज्याचे शिर्डीकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी शिर्डी मतदारसंघ अक्षरशा पिंजून काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या उमेदवारासाठी दोनदा शिर्डीला येऊन गेले आहेत. यावरून यंदाची निवडणूक ही महायुतीसाठी देखील मोठी आव्हानात्मक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

एवढेच काय तर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर महाराष्ट्रातील फायर ब्रँड मंत्री म्हणून ख्यातनाम दादा भुसे हे देखील महायुतीच्या उमेदवारासाठी वातावरण तयार करत आहेत. त्यांनी मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांच्या अन पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन लोखंडे यांच्यासाठी वातावरण तयार करण्यास सुरवात केली आहे. भुसे यांच्या बैठकांचा जोर वाढला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील या जागेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. उबाठा शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी माजी खासदार वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी देखील प्रचारात मागे राहिलेली नाही. वंचितचे कार्यकर्ते मतदार संघात पायाला भिंगरी बांधून प्रचार करताना दिसत आहेत. यामुळे ही तिरंगी लढत चांगलीच चुरशीची बनली आहे.

हे 3 नेते ठरणार किंगमेकर

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या तिन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हे तिन्ही नेते या जागेसाठी किंगमेकरची भूमिका निभावणार आहेत.

शिर्डी बाबत बोलायचं झालं तर येथील विधानसभा मतदारसंघात नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सलग पाच वेळा निवडून आले आहेत. म्हणजेच तब्बल 25 वर्ष त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा त्यांचा बालेकिल्ला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शिर्डी नगरपरिषद आणि राहता नगरपरिषद येथे विखे पाटील यांची सत्ता आहे. या मतदारसंघातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर विखे पाटील यांची सत्ता असून गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील हे किंग मेकर ठरले होते. विखे पाटील यांचे मतदारसंघात असणारे वजन गेल्यावेळी सदाशिव लोखंडे यांच्या कामी आले आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची देखील या निवडणुकीत मोठी भूमिका राहणार आहे. थोरात यांचा मतदारसंघात बोलबाला आहे यात शंकाच नाही. दरम्यान थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावले असून माजी खासदार वाघचौरे यांना विजयी बनवायचे असा निर्धार केला आहे.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराला तिकीट देऊन निवडणूक अधिक चुरशीची बनवून ठेवली आहे. वंचित कडून देखील लोकसभेसाठी जय्यत तयारी केली जात असून त्यांचे कार्यकर्ते गावागावात प्रचार करत आहेत. यामुळे यंदा या जागेवरून कोणाचा विजय होतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.