पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने करण्यात आली असून, प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी नगर शहर सज्ज झाले आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या वेळी याच मैदानावरुन मोदींनी संबोधित केले होते. या आठवणींना उजाळा देवून महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विजयाचा निर्धार पुन्हा एकदा या एैतिहासिक सभेतून होणार आहे.
शहरातील निरंकारी भवना शेजारील मैदानावर मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. सुमारे १ लाख नागरीकांच्या उपस्थित सभा होण्याच्या दृष्टीने महायुतीच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. या सभेला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ या महासंकल्प विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मैदानावर भव्य सभामंडप उभारण्यात आला असून, १ लाख नागरीकांच्या बसण्याची व्यवस्था या मंडपात करण्यात आली असून, उन्हाची तिव्रता लक्षात घेवून सभामंडपामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
भव्य अशा स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. महायुतीच्या वतीने प्रधानमंत्र्यांचा भव्य सत्कारही करण्यात येणार असून, ठिकठिकाणी महायुतीचे झेंडे, फ्लेक्स बोर्ड लावून या सभेची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून या सभेला नागरीक येणार असल्याचे चौदा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे महाआवास योजने अंतर्गत घरकुल वितरण कार्यक्रम १९ ऑक्टोंबर २०१८ रोजी तसेच मागील लोकसभा निवडणूकीत डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ दि. १२ एप्रिल २०१९ रोजी आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यासाठी २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी जिल्ह्यात आले होते.