Sujay Vikhe News : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभर धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार आता जाहीर केले आहेत. नगर दक्षिणमध्ये महायुतीकडून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तसेच महाविकास आघाडी कडून विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेऊन विखे पाटील यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. दरम्यान, आता उभय नेत्यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह महायुतीमधील नेत्यांनी सुद्धा आता विखे पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारसभेत आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील हे दोन्ही सोबतच प्रचार करत आहेत. दरम्यान, नुकत्याच एका प्रचार सभेत आमदार संग्राम जगताप यांनी खासदार सुजय विखे पाटील यांची लोकसभेतील जुनी भाषणे दाखवलीत.
यात विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध अडचणी सभागृहात मांडल्यात. वेगवेगळ्या विकास कामांसाठी, कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावर त्यांनी सभागृहात सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे आवाज उठवलेत.
या व्हिडिओज मध्ये विखे पाटील यांनी कशा पद्धतीने हिंदी आणि इंग्रजीमधून भाषणे करत आपल्या लोकसभा मतदारसंघातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला हे त्यांनी दाखवले.
दरम्यान, जगताप यांनी खासदार महोदय यांचे ही भाषणे दाखवल्यानंतर स्वतः खासदार महोदय यांनी प्रचार सभेला जमलेल्या मतदारराजांना संबोधित केले. यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
यावेळी पाटील यांनी मी केलेले हिंदी किंवा इंग्रजी मधील भाषण जर समोरच्या उमेदवाराने एका महिनाभरात तोंडपाठ केलीत तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे चॅलेंज त्यांनी दिले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, आपण दिल्लीला कशासाठी जातोय ? तिथे फिरायला जातोय, तिथे अक्षरधाम मंदिरात दर्शनाला जातोय, माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना तिथे स्टॉप घेतोय ? आपण का दिल्लीला गेल पाहिजे ? असा सवाल यावेळी उपस्थित केला.
तसेच यावेळी विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील एकच माणूस असा असेल ज्याचं चार जूनला अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी डिपॉझिट जप्त होईल, तो अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विरोधी पक्षातील नेता राहील असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी जेव्हा संग्राम जगताप आमदार झालेत तेव्हा त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी एकत्रित बसून सारे मतभेद विसरण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा परिणाम आणि जेव्हा दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते हातात हात घालून एकत्रित काम करतात तेव्हा पंधरा वर्षे रखडलेला फ्लायओव्हर पूर्ण होतो, दहा वर्ष रखडलेला बायपास पूर्ण होतो, अनेक वर्ष रखडलेली पाणीपुरवठा योजना देखील पूर्ण होती, अनेक वर्षांपूर्वी मंजूर झालेले आयुष हॉस्पिटल देखील पूर्ण होते, तसेच अशी अनेक विकास कामे पूर्ण झालीत, असे म्हटले आहे.