Sujay Vikhe News : भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला अन तेव्हापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
पारनेरचे माजी आमदार तथा शरदचंद्र पवार पक्षातील निलेश लंके सध्या मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढून जनसंपर्क वाढवत आहेत. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून पुन्हा एकदा विजयाची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे महायुतीचे इतर मित्र पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी देखील विद्यमान खासदार महोदय यांच्या प्रचारात दंग झाले आहेत.
महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सुजय विखे पाटील हेच विजयी होणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. खरे तर सुजय विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. शहरातील उड्डाणपुलाचे प्रलंबित काम सुजय विखे यांच्या काळात पूर्ण झाले आहे. आयुष हॉस्पिटल, बायपास रोड, नगर-करमाळा महामार्ग, नगर शहरातील पाण्याचा प्रश्न, भूमिगत गटारीचा प्रश्न निकाली काढण्याचे काम सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
यामुळे या कामाचे भांडवल यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या कामी येणार असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे प्रचारात देखील सुजय विखे यांनी आघाडी घेतलेली आहे. त्यांनी जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देखील दिलेली नव्हती तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण की लोकसभेचा कार्यक्रम जेव्हा जाहीर झालेला नव्हता त्यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला साखर आणि चणाडाळ वाटप केले.
साखर आणि चणाडाळ वाटपाचा कार्यक्रमातून त्यांनी मत पेरणीला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे जेव्हा त्यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्षांतर्गत होत असलेला विरोध लक्षात घेता पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे काम केले. विशेष म्हणजे पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे त्यांच्यावर नाराज होते मात्र त्यांची ही नाराजी आता दूर झाली आहे. पक्षातील नेत्यांची नाराजी दूर केल्यानंतर सुजय विखे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यासाठी महायुतीत समाविष्ट असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला, भाजपची निवडणूक पूर्वतायरीची बैठक घेतली, शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा सुद्धा नुकताच संपन्न झाला आहे.
या मेळाव्यांना राज्याचे महसूल मंत्री तथा विद्यमान खासदार आणि महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे आज त्यांनी थेट जिल्ह्याच्या बाहेर जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कामोठे येथे आज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील कामोठे या ठिकाणाला मिनी नगर म्हणून संबोधले तर काही वावगे ठरणार नाही. कारण की, कामोठे या ठिकाणी पारनेर तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग या निमित्ताने वास्तव्याला आहे. हेच कारण आहे की सुजय विखे पाटील यांनी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवलेले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे निलेश लंके प्रचाराच्या बाबतीत अजूनही विखे यांच्या मागेच आहे. ते जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघात जनसंपर्क वाढवत आहेत मात्र महाविकास आघाडी मधील इतर पक्षांच्या माध्यमातून अजूनही त्यांच्यासाठी फारसा प्रचार होत नसल्याची वास्तविकता आहे. महा विकास आघाडीतला ठाकरे गट तर नगर दक्षिण मध्ये शांत आहेच शिवाय शिर्डी लोकसभा मतदार संघात देखील शांत पाहायला मिळत आहे.
निलेश लंके यांनी महाविकास आघाडी मधील घटक पक्षाचे मेळावे सुद्धा घेतलेले नाहीत. यावरून मवीआमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर सुजय विखे पाटील यंदाची निवडणूक सहज जिंकतील असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.