किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही ! खा. सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं….

Tejas B Shelar
Published:
Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. थेट विद्यमान खासदारालाच गोळ्या घालण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.

ही ऑडिओ क्लिप सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या नवी मुंबईतील कामोठे येथील सभेत देखील ऐकवली गेली. या ऑडिओ क्लिप मध्ये दोन व्यक्तींचा फोनवरील संवाद आहे. यात पारनेर तालुक्यातील कळस गावातील माजी उपसरपंच आणि निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष यामधील संवाद असल्याचे बोलले जात आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष याने समोरच्या व्यक्तीला म्हणजेच कळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच याला शिव्या दिल्या आहेत तसेच त्याला धमकी देखील दिली असल्याचे उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे लंके मीडिया सेलच्या अध्यक्षांनी सुजय विखे यांना गोळी घालण्याची धमकी दिली आहे. खरे तर कळस गावातील माजी उपसरपंच यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सुजय विखे पाटील पुन्हा एकदा विजयी होतील असे म्हटले होते.

मात्र, या बाईटमुळे निलेश लंके सेलचे अध्यक्ष प्रचंड संतापले आहेत. या संतापात त्यांनी माजी उपसरपंचाला धमकी दिली आहे आणि विद्यमान खासदार यांना गोळी घालू असे म्हटले असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान खासदारांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आली असल्याने सध्या हा मुद्दा नगरच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. राज्याचा राजकारणात या मुद्द्यावरून चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान जीवे मारण्याच्या धमकीवरून खासदार सुजय विखे पाटील यांची देखील प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

खरे तर अजून नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले गेलेले नाहीत. मात्र उमेदवारी अर्ज भरलेले नसतानाही गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने ही बाब खूपच गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.

यामुळे या प्रकरणात प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे आणि सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विखे समर्थक यांच्या माध्यमातून होत आहे. साहजिकच या मुद्द्यावरून नगरचे राजकारण आगामी काळात आणखी तापणार आहे.

दरम्यान सुजय विखे यांनी देखील या धमकीवर भाष्य केले आहे. खा. विखे म्हणतात की, ‘पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशदीत आयुष्य जगलं आहे. मात्र, आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी पुन्हा लोकसभेत जात आहे.’

यावेळी त्यांनी किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही. 4 जून 2024 ला समोरच्या उमेदवाराचं (निलेश लंके) डिपॉझिट जप्त होणार, हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe