Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात अकराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण मध्ये देखील असे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे.
ही निवडणूक जरी निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी असली तरी देखील प्रत्यक्षात विखे पाटील विरुद्ध शरद पवार अशीच ही लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील आणि महायुती मधील इतर मित्र पक्षांनी त्यांच्या विजयासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज अर्थातच सात एप्रिल 2024 ला नवी मुंबई येथील कामोठे या ठिकाणी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने होत आहे.
खरे तर, कामोठे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण मधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील अनेकजण नोकरीं, उद्योगानिमित्त वास्तव्याला आहेत. येथे, हजारोंच्या संख्येने स्थायिक झालेली पारनेर तालुक्यातील जनता आजही आपल्या मातृभूमीशी कनेक्ट आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आमदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विखे पाटील यांनी विजयाची मोट बांधायला सुरवात केली आहे.
कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार मैदान, सेक्टर 11, पोलीस स्टेशनच्या समोर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नालंदा बुद्ध विहार मैदानातून सुजय विखे पाटील यांच्यासाठी लोकसभेसाठी ग्राउंड तयार केले जात आहे.
नगर दक्षिण मधील अनेक मतदार येथे कामाला असल्याने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे. हा कार्यक्रम महायुतीचे नगर दक्षिणचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या नवी मुंबईतील कामोठे येथे होत असलेल्या या सोहळ्याकडे पारनेर सहित संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
कसं असणार कार्यक्रमाचे नियोजन
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राहणार आहे. प्रसिद्ध गायक परमेश माळी यांच्या आर्केस्ट्राचा कार्यक्रम या कालावधीत राहणार आहे. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहील तर दुसरीकडे याच कालावधीत म्हणजेच सहा ते सातच्या दरम्यान शाही मिरवणूक देखील काढली जाणार आहे.
या शाही मिरवणुकीत हत्ती घोडे उंट झांज पथक आणि हलगी हे विशेष आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. यानंतर सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत मान्यवरांचे मनोगत राहणार आहे. तसेच रात्री नऊ ते दहा या कालावधीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित राहणार आहे.