दिवस भासे वर्षासमान ! लंके की विखे ? निकालासाठी १९ दिवस, लोकांत प्रचंड उत्साह, लाखोंच्या पैजा, सगेसोयऱ्यांकडेही कानोसा, सट्टा बाजारही तेजीत असल्याची चर्चा

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe vrs lanke

जवळपास वर्षभरापासून चर्चेत असणारी अहमदनगर लोकसभेतील लंके-विखे सामना असणारी निवडणूक १३ तारखेला झाली. आता येत्या ४ जूनला निकाल लागेलच, पण या निकालासाठी १९ दिवसांचा कालावधी आहे. हे दिवस आता कर्यकर्त्यांसाठी नागरिकांनाही वर्षभराच्या कालावधीप्रमाणे भासू लागल्याचे चित्र आहे.

सध्या कोण होणार अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार, याचीच चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात गावच्या कट्ट्यावर सध्या हा विषय चर्चिला जात आहे. अहमदनगर लोकसभेच्या मैदानात २५ उमेदवार होते. मुख्य लढत मात्र महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्यात झाली. त्यामुळे आता विखे की लंके? ही चर्चा रंगत आहे.

आकडेवारी शोधण्यावर भर
गावोगावचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला मते नेमकी कुठून किती मिळणार?, याची आकडेमोड करताना दिसत आहेत. त्यात राहुरी आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी वाढल्याने निवडणुकीत नवा द्विस्ट आला आहे. ही वाढलेली मते कुणाच्या पारड्यात पडणार, याचे अंदाज बांधले जात आहेत.

अमुक एका मतदारसंघात मताधिक्य मिळाल्यास आमचा उमेदवार विजयी होणार, असे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. त्याची कसर आमचा उमेदवार इकडे भरून काढणार?, असेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर सगेसोयऱ्यांना फोन करून कानोसा घेतला जात आहे; परंतु आता काहीच सांगू शकत नाही, एकदम कांटे की टक्कर आहे, असे सांगून पाहुणेही वेळ मारून नेत आहेत

ग्रामीण भागात मतदानात चुरस पाहायला मिळाली. शेतकऱ्यांमध्ये वाढती महागाई, कांद्याचे पडलेले दर, दुधाला मिळत असलेला कमी भाव यामुळे रोष होता. काही शेतकऱ्यांनी तर कांद्याची माळ गळ्यात घालून मतदान केले. दूध रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध केला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मतपेटीतून रोष व्यक्त केला असावा का?, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शहरी भागात एकगठ्ठा मते कुणाला मिळाली असतील, याची आकडेमोड केली जात आहे. जय-पराजयाची गणिते मांडली जात आहेत.

आपलाच उमेदवार कसा निवडणूक जिंकेल, हे कार्यकर्ते एकमेकांना पटवून देताना दिसत आहेत. नेतेमंडळी तर कोपऱ्यात घेऊन काय अंदाज आहे, कोण येईल निवडून, अशी विचारणा करताना दिसत आहेत.

कार्यकर्त्यांच्या पैजा
कार्यकर्त्यांनी मांडलेले विजयाचे गणित पचनी पडत नसल्याने विरोधी गटाच्या कार्यकर्त्याकडून पैजासाठी हात पुढे केले जात आहेत. हजारापासून लाखापर्यंत बोली लावली जात आहे. आपल्या नेत्यासाठी जिवाचे रान करणाऱ्यांना विरोधकांचे म्हणणे पटत नाही अशावेळी काही ठिकाणी वादही होत आहेत.

सट्टाबाजारात तेजी?
मतदान झाल्यानंतर विजयासाठी पैजांबरोबरच सट्टाबाजारात उमेदवारांवर बोली लावली जात आहे. त्यामुळे सट्टाबाजार तेजीत असल्याची चर्चा सध्या विविध ठिकाणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe