Ahmednagar News : ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, त्यांनाच सोबत घेवून भाजपवाले फिरत आहेत, असा घणाघात खा. शरद पवार यांनी केला. नगर येथे शुक्रवारी (दि.१९) गांधी मैदानात सभा झाली.
तद्नंतर म्हणजे शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत खा. पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडाडून टिका केली. केंद्रातील भाजप सरकार तसेच केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी टिकास्र सोडले.
ते म्हणाले की, मंत्री अमित शहा यांनी सत्ता असताना तुम्ही काय केले, असा आरोप आमच्यावर केला. मात्र ज्यांच्याकडे १० वर्षांपासून सत्ता आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, याचे उत्तर देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मी सत्तेत होतो, त्यावेळी शेतकऱ्यांसाठी काय केले, असे अख्ख्या जगाला माहिती आहे.
त्यांनी मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असा दावा त्यांनी केला. जलसिंचन घोटाळ्याबाबत एकेकाळी आरोप करण्यात आला होता. मात्र ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनाच घेवून फिरत आहेत, अशा कडव्या शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टिका केली.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे ५ टप्पे आहेत. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रवादीतर्फे १० जागा लढविण्याचा निर्णय जाणिवपूर्वक घेण्यात आला आहे. एक-दोन जागा वगळल्या तर सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. लोकसभेच्या कमी जागा लढवून विधानसभेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शरद पवारांनी जिल्ह्यातील नेत्यांमध्ये भांडणे लावली, जिल्ह्याचे वाटोळे केले, असे टिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी खोचक टिका केली. त्यांच्याबद्दल भाष्य करणे मला योग्य वाटत नाही.
त्यांच्यात सातत्य नाही. कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये अन् आता भाजपात ते आहे, अशी मोजकीच मार्मिक टिका त्यांनी ना. विखेंवर केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके, प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.